PMP Bus : पीएमपी प्रशासनाला १०० एकर जागेची प्रतीक्षा; ५५ नवीन आगार, टर्मिनलचा प्रस्ताव
esakal May 07, 2026 03:45 AM

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात यंदा एक हजार ७०० नवीन बस दाखल होत असून, त्यांच्या पार्किंग आणि देखभालीसाठी प्रशासनाने १०० एकर जागेची मागणी केली. ५५ नवीन आगार व टर्मिनल उभारण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेसह विविध प्राधिकरणांकडे हा प्रस्ताव पाठविला.

पीएमपीच्या ताफ्यात सध्या दोन हजारांहून अधिक बस असून, केवळ १७ आगार उपलब्ध आहेत. वर्षाअखेरीस येणाऱ्या नवीन बससाठी चार्जिंग स्टेशन, पार्किंगची सुविधा अपुरी पडणार आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने निर्णय घेतला.

बस दृष्टिक्षेपात

  • एकूण बस - २०७२

  • प्रवासी सेवेत - १७६०

  • प्रत्यक्ष रस्त्यावर - सुमारे १६००

  • प्रवासी संख्या - १२ लाख (दैनंदिन)

  • सेवेचे क्षेत्र - ७,२५६ चौरस किलोमीटर

  • बसचे मार्ग - ३८५

  • प्रवासी उत्पन्न - सुमारे १.५० कोटी (दैनंदिन)

  • एकूण कर्मचारी - ८,५००

अशी आहे जागेची मागणी

  • पुणे महापालिका - २४ ठिकाणे

  • पिंपरी-चिंचवड - १९ ठिकाणे

  • पीएमआरडीए - ३ ठिकाणे

  • एमआयडीसी - २ ठिकाणे

  • जिल्हाधिकारी क्षेत्र -१९ ठिकाणे

पीएमपीच्या ताफ्यातील वाढत्या बससाठी मोठ्या जागेची गरज आहे. विविध संस्थांकडे जागेची मागणी केली असून, ती उपलब्ध झाल्यास नवीन बसचे संचलन सुरळीत होईल. याचा थेट फायदा प्रवाशांना मिळेल.

- महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.