पुणे : ‘ओएलएक्स’वर दुचाकी विक्रीची ऑनलाइन जाहिरात देणे एका वाहनमालकाला चांगलेच महागात पडले. ‘टेस्ट ड्राईव्ह’च्या बहाण्याने दुचाकी चोरून नेणाऱ्यास विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महम्मद मुजबता इकबाल शेख (वय २७, रा. खडी मशिन चौक, कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी विक्रीसाठी ओएलएक्सवर पोस्ट केली होती. त्यावर एका व्यक्तीने ईशिता माथुर नावाच्या प्रोफाईलमधून गाडी घेण्यास रस दाखवला. त्यानंतर ‘टेस्ट ड्राईव्ह’च्या बहाण्याने नजर चुकवून तो दुचाकीसह पसार झाला. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या सूचनेनुसार पोलिस अंमलदार अंकुश जोगदंडे यांनी आरोपीच्या ओएलएक्स अकाउंटची माहिती काढून मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटववली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून दुचाकी जप्त केली आहे.