आळंदी : शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत ग्रामपंचायत साठी पाणीपुरवठा योजनेच्या जलजीवन मिशन अंतर्गत कामासाठी आणलेले लोखंडी पाईप जळाले. लाखो रुपयांचे नुकसान या आगीच्या घटनेत झाल्याचे प्राथमिक दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे दोन चाकण नगरपरिषदेचे एक अग्निशमन वाहन आणि काही पाण्याचे टँकर आणून ही आग तब्बल दोन ते अडीच तासात आटोक्यात आणण्यात आली.
ही आगीची घटना आळंदी वडगाव घेनंद रस्त्यावर चऱ्होली खुर्द हद्दीत ज्ञानसागर वेअर हाऊस लगत दुपारी तीनच्या दरम्यान घडली. प्राथमिक दृष्ट्या वीज मंडळाची तार शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर वीज मंडळाकडून सांगण्यात आले की वाऱ्यामुळे पत्रा उडाला आणि वीज प्रवाह करणाऱ्या तार तुटली यामुळे शॉर्टसर्किट झाला होता. मात्र अद्याप पंचनामा न झाल्याने नेमके कारण कळू शकले नाही.
चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत जल जीवन मिशन अंतर्गत कामासाठी लोखंडी पाईप गोडाऊन वजा जागेमध्ये उघड्यावर ठेवले होते. आजूबाजूला वाळलेले गवत होते तसेच अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुपारी तीनच्या दरम्यान आग लागली आणि हवेमध्ये आगीचे लोळ पसरू लागले. आगीची तीव्रता पाहता स्थानिक नागरिक सौरभ थोरवे यांनी अग्निशमन दल प्रचारण केले. पिंपरी चिंचवड आणि चाकण नगरपालिका मिळून चार अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली. तसेच स्थानिकांनी टँकरही पाठवले होते. अग्निशमन दलाच्या आणि स्थानिकांच्या हातात प्रयत्नानंतर तब्बल दोन ते अडीच तासांनी आग आटोक्यात आली. पुढील अनर्थ टाळला. दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनीच्या कामासाठी पाईप ठेवण्यासाठी ही जागा ठेकेदाराने भाड्याने घेतली होती. आगीमध्ये लाखो रुपयांच्या पाईपचे नुकसान झाले.
याबाबत चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बिंदले यांनी सांगितले, केळगाव वडगाव घेणंद सोळू आणि चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत साठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना चे काम सुरू आहे. त्यासाठीचे पाईपलाईन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या मार्फत असलेल्या ठेकेदाराने ठेवले होते. पाईपंची संख्या मोठी होती आणि आजूबाजूला गवत वाढले होते. यामुळे आगीमध्ये पाईपंचे मोठे नुकसान झाले.
आळंदी शहर वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता संदीप पाटील यांनी सांगितले की, वाऱ्यामुळे पत्रा उडाला आणि वीज पुरवठा करणारी तार तुटली. पुढे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तेथील मीटर व्यवस्थित आहे. आमचे कर्मचारी स्थानिक ठिकाणी जाऊन पंचनामा करणार आहेत. दरम्यान आगीच्या वेळेस काही काळ विज पुरवठा खंडित केला होता.
दरम्यान हाकेच्या अंतरावर असलेल्या आळंदी नगर परिषदेची अग्निशमन वाहन दुरुस्तीला टाकले असल्याने अशा आगीच्या घटनेमुळे नगर परिषदेचे तत्परते बाबत शंका उपस्थित झाली. याबाबत आळंदी नगर मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, आळंदी नगरपरिषद दहा वर्षापासून अग्निशमन वाहन दुरुस्त केले नव्हते. परिणामी इंजिनचे काम निघाले. दुरुस्तीसाठी शोरूम मध्ये पाठवले आहे. याचबरोबर नव्याने आठ दिवसात छोटी अग्निशमन वाहन नगर परिषद विकत घेत आहे.