पुणे - हडपसर परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४२ वर्षीय नराधमाला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची कठोर शिक्षा बुधवारी (ता. ६) सुनावली. हेमंत कडुबा काथार (वय ४२) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या निकालामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत असून, ‘निर्भया’ला आठ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे.
हडपसर परिसरात २०१८ मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपी हेमंत काथार याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडिताच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी कौशल्याने केला. त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ भौतिक आणि तांत्रिक पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता लीना पाठक यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी बाजू मांडली.
विशेष न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अंमलदार संभाजी म्हांगरे यांनी सर्व पुरावे वेळेत सादर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून आरोपी हेमंत काथार याला दोषी ठरवले. आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सागर कवडे आणि सहाय्यक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.