हे लग्न खूप गाजलं, सोशल मीडियावरही त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाले. तसेच या सोहळ्यात इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिच्याप्रमाणेच इंदोरीकर महाराज यांच्या मुलाचीही खूप चर्चा झाली.
इंदुरीकर महाराजांच्या मुलाचे नाव कृष्णा इंदुरीकर आहे. कृष्णाने अवघ्या 8 व्या वर्षी पहिल्यांदा मंचावर गाणं सादर केलं. लहानपणापासूनच त्याला गायन, अभंग आणि कलेची आवड निर्माण झाली. त्याची ही आवड पाहून इंदुरीकर महाराजांनी त्याला वारकरी संप्रदायात मार्गदर्शन देण्याचा निर्णय घेतला.
एवढंच नव्हे तर त्यांनी कृष्णाला पुढील शिक्षणासाठी भगवानगड येथे पाठवलं. तिथे वारकरी आणि वैष्णव परंपरेचे शिक्षण देणारं ज्ञानेश्वरी विद्यापीठ आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी 2005 साली या विद्यापीठाची स्थापना केली. येथे किमान6 वर्षांचं शिक्षण दिलं जातं. सुरुवातीची 3 वर्षे मूलभूत शिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये नारायण महाराज शास्त्री मार्गदर्शन करतात.
तर शेवटची ३ वर्षे स्वतः महंत नामदेव शास्त्री विद्यार्थ्यांना शिकवतात. विशेष म्हणजे या शिक्षणासाठी कोणतेही शुल्क अर्थात फी आकारली जात नाही. इंदोरीकर महाराजांचा मुलगा कृष्णा हाही तिथे शिकत असून त्याच्या शिक्षणाचा अंतिम टप्पा सुरू आहे.
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नासाठी नामदेव शास्त्री महाराजही आले होते, त्यांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. याच सोहळ्यात नामदेव शास्त्री महाराज हे कृष्णाबद्दलही बोलले. “आगामी काळात कृष्णा इंदुरीकर हा विद्वानांना देखील प्रभावित करणारा ठरेल. गेल्या २३ वर्षांत आमच्या गडावर असा विद्यार्थी आला नाही. त्याने अत्यंत उत्कृष्ट अभ्यास केला असून, भविष्यात तो ज्ञानेश्वरीची धुरा सांभाळेल. तो भगवानगडासाठी अभिमानास्पद आहे ” असं त्यांनी नमूद केलं.