भीषण अपघात! अनियंत्रित भरधाव ट्रेलर थेट टरबूजच्या दुकानात शिरला, निष्पाप तरुणाला चिरडलं, जागीच दुर्दैवी मृत्यू, तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील घटना
प्रशांत देसाई May 07, 2026 04:13 PM

Gondia Accident News : गोंदियाच्या तुमसरमधून एक अपघाताची खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात वैनगंगा नदी पुलावर असलेल्या टरबूज विक्रेत्याच्या दुकानात भरधाव ट्रेलर शिरला. या भीषण अपघातात टरबूज खरेदी करणारा तरुण अक्षरश: चिरडला गेलाय. हा अपघात इतका भीषण होता कि या तरुणाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील माडगी इथं घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली आहे. मात्र भीषण अपघातात निष्पाप तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Gondia Accident News : कोळसाचा वाहतूक करणाऱ्या ट्रेलर अनियंत्रित झाला अन् थेट दुकानात शिरला...

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश ओके (३०) असं मृतं तरुणाचं नावं आहे. मृतक हा मध्यप्रदेशातील बालाघाट येथील असून तो माडगी इथं टरबूज खरेदीसाठी थांबला होता. यावेळी कोळसाचा वाहतूक करणाऱ्या ट्रेलर अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या टरबूजच्या दुकानात शिरल्यानं ही घटना घडली. या अपघातात टरबूज विजेत्याचं हजारो रूपयांचं नुकसान झालय. तर दुसरीकडे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Chandrapur Accident : मजुरी कामावर जाणाऱ्या महिलेच्या सायकलला मालवाहू ट्रकची धडक, महिलेचा जागीच अंत

चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प चौकात मजुरी कामावर जाणाऱ्या महिलेच्या सायकलला मालवाहू ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात तणाव पसरला होता. चंद्रपूर-नागपूर मार्ग असो वा गडचिरोली-बल्लारपूर मार्ग या सर्वच मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक शहरवासीयांच्या मुळावर उठली आहे. कालच दोन वेगवेगळ्या घटनात दोन मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी शहरातील अतिव्यस्त बंगाली कॅम्प चौकात सायकलीने रोज मजुरी करण्यासाठी जाणाऱ्या महिलेला मालवाहू ट्रकने चिरडले. यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Chandrapur Accident : अतिव्यस्त चौकांमध्ये वाढणारे अपघात नागरिकांच्या चिंतेचा विषय

दरम्यान, रोज शहरातील अतिव्यस्त चौकांमध्ये वाढणारे अपघात नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरले आहेत. शहराला बायपास मार्गाची गरज असताना यापूर्वी योजनेत असलेले वळण मार्ग रद्द करून जिल्हा प्रशासनाने घोडचूक केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मनपातील विरोधी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. वळण मार्ग नव्याने निश्चित करून कामाला सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.