भारताने लॉन्च केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आज एक वर्ष पूर्ण झालं. या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतातील विरोधी पक्षातील नेत्यांच्या मनात आजही काही शंका आहेत. त्यांनी अनेकदा त्या बोलून दाखवल्या. पण भारतातील राजकारण्याच्या मनातील या शंका, त्यांचं बोलणं किती चुकीचं आहे, यावर अमेरिकी सैन्य एक्सपर्ट जॉन स्पेंसर यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. ऑपरेशन सिंदूर हा भारताचा मोठा रणनितीक विजय असल्याचं जॉन स्पेंसर यांनी म्हटलं आहे. पहलगाममध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारतीय सैन्य दलांन ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होत. या एअर फोर्सची भूमिका महत्वाची होती. 7 ते 10 मे असा चार दिवस भारत-पाकिस्तानमध्ये हा सैन्य संघर्ष सुरु होता. 10 मे च्या सकाळपर्यंत भारताने पाकिस्तानच्या आकाशावर पूर्णपणे वर्चस्व स्थापित केलं होतं. पाकिस्तानची हवाई क्षमता कमजोर झाली होती असं जॉन स्पेंसर म्हणाले.
जॉन स्पेंसर हे अमेरिकन सैन्यात मेजर होते. आता ते मॅडिसन पॉलिसी फोरममध्ये वॉर स्टडीज आणि अर्बन वारफेयर इंस्टीट्यूटचे डायरेक्टर आहेत. भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली कशी कमकुवत केली, त्या बद्दल त्यांनी एक्सवर विस्ताराने सांगितलं आहे. 8 मे रोजी भारताने पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा प्रणालीवर हल्ले केले. चूनिया आणि पासरुर येथील अर्ली वार्निंग रडार आणि HQ-9 एअर डिफेन्स सिस्टिमला टार्गेट करण्यात आलं. लॉयटरिंग मुनिशनने हे हल्ले करण्यात आले. पाकिस्तानी रडार आणि मिसाइल सिस्टिमला दबावाखाली ठेवणं हा यामागे उद्देश होता. भारताने या हल्ल्यात पाकिस्तानचे डोळे, समन्वय आणि उत्तर देण्याची क्षमताच संपवून टाकली. म्हणजे रडार, एअर डिफेन्स सिस्टिमच उखडून टाकली.
तिथेच त्यांचा आत्मविश्वास ढासळला
स्पेंसर यांनी अजून एका महत्वपूर्ण मुद्याकडे लक्ष वेधलं. भारताने S-400 व्दारे एक हाय वॅल्यू एयरबॉर्न प्लॅटफॉर्म म्हणजे पाकिस्तानी अवॉक्स विमान जवळपास 300 किलोमीटर अंतरावरुन पाडलं. अवॉक्स ही हवेतील उडती रडार सिस्टिम असते. शत्रूच्या प्रदेशात काय चाललय याची अचूक माहिती अवॉक्स सिस्टिमकडून मिळते. भारताने S-400 द्वारे पाकिस्तानचे हे विमान हवेतच उडवून टाकलं. त्यावेळी पाकिस्तानला कळलं की आपली विमानं सुरक्षित नाहीत. जमिन असो वा हवा भारत सहजपणे खोलवर विमानं पाडू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. तिथेच त्यांचा आत्मविश्वास ढासळला. मग संघर्षविरामासाठी ते अमेरिकेकडे धावले.