Maharashtra Rain weather News : राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. अशातच आज राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तळकोकणात सह्याद्री पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर सातारा, नांदेड जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील वैभववाडी, फोंडा, करुळ सह कणकवली, वैभववाडी तालुक्याच्या भागात अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसासाठी येलो अलर्ट पावसाचा जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा वेग आहे.
सातारा जिल्ह्यातही अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे, बोरगाव, नागठाणे, शहरातील उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहनधारकांची चांगलीच उडाली तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून साताऱ्यात प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत होता. आज अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना हवेत गारवा अनुभवायला मिळत आहे.
रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात मुसळधार पावसाची बरसात सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने वांगणे आणि परिसराला झोडपून काढलं आहे. अशातच एका घराचा पत्रा हाय टेन्शन वायरमध्ये अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असून नागरिक भयभीत झाले आहेत. वांगणी पश्चिमेकडील श्रीनगर भागात ही घटना घडलीय. घराचा पत्र आहे टेन्शन वायरमध्ये अडकताच जीव वाचवण्यासाठी इथल्या रहिवाशांची धावाधाव झाल्याचं पाहायला मिळालं. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन हीच प्रवाह खंडित करावा अशी मागणी इथल्या रहिवाशांमधून केली जात आहे.
नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूर तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलं आहे. आजच्या या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः या भागात उन्हाळी तीळ अन भुईमुंग पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते, या दोन्ही पिकांसह हळदीला देखील या पावसाचा फटका बसलाय. त्याचबरोबर आज अनेक आयोजित लग्नसोहळ्याला या वादळी वाऱ्यासह गारपीटीचा फटका बसलाय. त्यामुळे ऐनवेळी वऱ्हाडी मंडळींचे मोठे हाल झाले. आजच्या पावसाने माहूर सह शेजारच्या किनवट तालुक्यात दाणादाण उडवली आहे. अचानक आलेल्या या वावटळीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला हवेत प्रचंड प्रमाणात धुळीचे कण पसरल्यामुळे शहरात काहीकाळ दृश्यमानता कमी झाली होती नागरिकांची धावपळ उडाली तर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.