आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 50 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकून होम टीम लखनौ सुपर जायंट्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. लखनौच्या सलामी जोडीने या संधीचा फायदा घेत टीमला जबरदस्त अशी सुरुवात मिळवून दिली आहे. अर्शीन कुलकर्णी आणि मिचेल मार्श या सलामी जोडीने लखनौसाठी कडक सुरुवात केली. मात्र पावसाने लखनौच्या बॅटिंगदरम्यान 2 वेळा खोडा घातल्याने खेळ थांबवावा लागला आहे. या सामन्यातून लखनौच्या एका खेळाडूला दुखापतीमुळे मुकावं लागलं आहे. त्या खेळाडूबाबत जाणून घेऊयात.
लखनौ आरसीबी विरूद्धच्या सामन्यात 3 बदलांसह मैदानात उतरली आहे. या 3 पैकी 2 खेळाडूंना दुखापत झाली आहे. लखनौचा वेगवान गोलंदाज मोहसिन खान याला दुखापतीमुळे आरसीबी विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलं आहे. तर शाहबाज अहमद याचा मनिमरण सिद्धार्थ याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. तसेच जोश इंग्लिस यालाही दुखापत झालीय. त्यामुळे जोशच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्रचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्शिन कुलकर्णी याला संधी देण्यात आली आहे. जोशच्या दुखापतीमुळे लखनौच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जोशला 19 व्या मोसमात एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. जोशने एकमेव सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळला होता. त्याआधी जोश खेळण्याची उपलब्ध नव्हता. जोशने आपण सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसणार याबाबतची माहिती आधीच लखनौ फ्रँचायचीला दिली होती. जोश त्याच्या लग्नामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. त्यानंतर आता जोशला 1 सामना खेळल्यानंतर दुखापत झालीय.
लखनौने जोशसाठी मिनी ऑक्शनमध्ये साडे कोटी पेक्षा अधिक रक्कम मोजली. लखनौ आणि हैदराबाद यांच्यात मिनी ऑक्शनमध्ये जोशसाठी चढाओढ पाहायला मिळाली होती. हैदराबादने जोशसाठी 8 कोटी 40 लाख रुपयांपर्यंत बोली लावली होती. मात्र अखेरच्या क्षणी लखनौ जोशला आपल्या टीममध्ये घेण्यात यशस्वी ठरली.
इंग्लंडमध्ये जन्मलेला जोश आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करतो. जोशने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचं 5 कसोटी, 33 एकदिवसीय आणि 46 टी 20i क्रिकेट सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. जोशने टेस्ट, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये 184, 766 आणि 1 हजार धावा केल्या आहेत.
तसेच जोशला आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा फारसा अनुभव नाही. जोश आयपीएलमध्ये आतापर्यंत 12 सामने खेळला आहे. जोशने या 12 सामन्यांमध्ये एकूण 291 धावा केल्या आहेत.