घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
डॉ. कृष्णा केंडे May 08, 2026 12:14 AM

छत्रपती संभाजीनगर: एकीकडे राज्यातील काही बस स्टँडवर चैन स्नॅचिंगच्या चोरीच्या (Stolen) घटना वाढत असून पोलिसांच्या कार्यक्षमेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यातच, आता शहरात (Sambhajinagar) नगरसेवकाच्या घराजवळ चोरीचा थरार पाहायला मिळाला. नगरसेवक मुन्शी भिकन शेख यांच्या घराजवळ उभी असलेली स्कॉर्पिओ चोरण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. विशेष म्हणजे मुन्शी यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घराबाहेर जात, चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्यांनी थेट नगरसेवकाच्या (Nagarsevak) अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

शहरातील मुन्शी भिकन शेख हे 6 मे 2026 रोजी पहाटे आपल्या राहत्या घरी हॉलमध्ये बसलेले असताना, सीसीटीव्ही स्क्रीनवर त्यांना घराबाहेर सुरू असलेली संशयास्पद हालचाल दिसली. घरासमोर पार्क केलेली स्कॉर्पिओ उघडून एक अज्ञात व्यक्ती आत बसत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे, शेख यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली, मात्र चोरट्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी, चोरट्यांच्या दिशेने धावलेले नगरसेवक शेख यांच्या अंगावर चोरट्यांनी चारचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी मारल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भरवस्तीत नगरसेवकावर झालेला हा हल्ला आणि चोरीच्या प्रयत्नामुळे शहरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता या टोळीचा शोध घेत आहेत.

नागरिकांमध्ये भीती अन् संताप 

दरम्यान, संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विचारपूस व पाहणी केली, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे संबंधित चोरट्यांची कार तपासली जात असून चोरट्यांचा शोध घेण्याचा तपास सुरू आहे. मात्र, भरवस्तीत अशाप्रकारे चक्क नगरसेवकाच्या अंगावर कार घालून मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात भीती आणि संताप व्यक्त होत आहे. 

कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कालिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.