ओपनर मिचेल मार्श याने केलेल्या चाबूक शतकी खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पहिल्यांदाच 200 पार मजल मारली आहे. मार्शने एकाना स्टेडियममध्ये स्पर्धेतील 50 व्या सामन्यात केलेल्या शतकामुळे लखनौला आरसीबीसमोर 213 धावांचं आव्हान ठेवता आलं. लखनौने पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. मात्र डीएलएसनुसार, आरसीबीला सामना जिंकायचं असेल तर 213 धावा कराव्या लागणार आहेत. लखनौला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता लखनौ आपलं आव्हान कायम राखणार की आरसीबी जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र लखनौच्या डावात पावसाने एकूण 3 वेळा खोडा घातला. त्यामुळे नाईलाजाने अखेर सामन्यातील 1 ओव्हर कमी करण्यात आली. लखनौने 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 209 धावांपर्यंत मजल मारली.
लखनौला मिचेल मार्श आणि अर्शीन कुलकर्णी या सलामी जोडीने चाबूक सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 9.2 ओव्हरमध्ये 95 रन्सची पार्टनरशीप केली. लखनौने अर्शीनच्या रुपात पहिली विकेट गमावली. अर्शीनने 24 बॉलमध्ये 17 रन्स केल्या. त्यानंतर मिचेल आणि निकोल पूरन या दोघांनी आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली.
लाईव्ह स्कोअरकार्ड
पूरन आणि मार्शने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी 41 चेंडूत 70 धावा जोडल्या. त्यानंतर मार्श आऊट झाला. मार्शने लखनौसाठी सर्वाधिक धावा केल्या. मार्शने 56 बॉलमध्ये 198.21 च्या स्ट्राईक रेटने 111 रन्स केल्या. मार्शनंतर निकोलस पूरन आऊट झाला. पूरनने 23 बॉलमध्ये 38 रन्स केल्या. पूरनने या खेळीत 1 षटकार आणि 4 चौकार लगावले.
लखनौ घरच्या मैदानात जिंकणार?
तसेच एडन मार्करम आणि कॅप्टन ऋषभ पंत ही जोडी नाबाद परतली. एडनने नाबाद 1 धाव केली. तर ऋषभने 10 बॉलमध्ये 320 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 32 रन्सची फायर खेळी केली. ऋषभने या दरम्यान 2 सिक्स आणि 4 फोर ठोकले. तर आरसीबीसाठी जोस हेझलवूड, कृणाल पंड्या आणि रसीख सलाम दार या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.