पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला वारजे माळवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या असून, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे आणि त्यांचे पथक गस्तीवर होते. यावेळी बारटक्के रुग्णालयाजवळ दुचाकीसह एक मुलगा उभा असलेला दिसला. पोलिसांनी त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाकडे चौकशी केली.
तेव्हा त्याने ती दुचाकी वारजे येथील बोरीकर रुग्णालयाच्या परिसरातून चोरल्याची कबुली दिली. तपासात त्याने वारजे माळवाडी, अलंकार, पिंपरी चिंचवड, खराडी, लोणीकंद परिसरातून आणखी नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या पथकाने केली.