Actress Vimi Struggle Life Story: हिंदी सिनेसृष्टीत (Hindi Film Industry) अनेक अशा कहाण्या आहेत, जिथे यशाच्या सर्वोच्च शिखरासोबत वेदनांची खोल दरीही जोडलेली असते. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, बॉलिवूडच्या (Bollywood News) दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) यांना 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून ओळखलं जातं. पण, मीना कुमारी यांच्याप्रमाणेच आणखी एक बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आहे, जिनं इंडस्ट्रीत यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं, पण त्यासोबतच तिचं आयुष्य वेदनांच्या खोल दरीत पुरतं बुडालं.
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलतोय, ती अभिनेत्री म्हणजे, 1960 आणि 1970 च्या दशकातली सौंदर्याची खाण असलेली सुपरस्टार अभिनेत्री विमी (Superstar Actress Vimi). जिनं इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि अल्पावधीतच यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली. पण, तिचा शेवट अत्यंत हादरवणारा ठरला.
सिनेसृष्टीत पाऊल ठेवताच विमीनं सर्वांची मनं जिंकून घेतली. तिचं सौंदर्य अगदी नजर खिळवून ठेवणारं होतं. तिचा पहिलाच सिनेमा, 'हमराझ' ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमात तिनं सुनील दत्त, शशी कपूर आणि राज कुमार यांसारख्या सिनेसृष्टीतील दिग्गजांसोबत काम केलं.
या सिनेमाच्या यशानंतर, विमी सिनेसृष्टीतील एक नवी 'सेंसेशन' म्हणून उदयास आली. त्यानंतर, ती निर्माते आणि दिग्दर्शक या दोघांचीही पहिली पसंती बनली. 1960 च्या दशकात, विमी ही एकमेव अशी अभिनेत्री होती, जी एका सिनेमासाठी 3,00,000 रुपयांचं मानधन घ्यायची.
श्रीमंत घराण्याची लेक, उच्चशिक्षित आणि त्यासोबतच कला आणि संगीताची विशेष आवड. तिचा आवाजही अतिशय मधुर होता. पण, तिनं सिनेसृष्टीत काम करावं, हे तिच्या कुटुंबाला मान्य नव्हतं. त्यामुळे आपल्या स्वप्नांना पाठपुरावा करण्यासाठी तिनं आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईला निघून आली.
अत्यंत कमी वयात विमी हिचं एका व्यावसायिक कुटुंबात लग्न झालं. तिला दोन मुलंही होती. तरीसुद्धा तिनं आपल्या करिअरला प्राधान्य दिलं आणि त्याचा परिणाम हळूहळू तिच्या वैयक्तिक आयुष्यावर दिसू लागला.
मीडिया रिपोर्टनुसार, एका पार्टीदरम्यान विमी हिची भेट प्रसिद्ध संगीतकार रवि यांच्याशी झाली होती. विमीच्या सौंदर्यानं आणि व्यक्तिमत्त्वानं प्रभावित होऊन रवि यांनी तिला सिनेमांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रवि यांनीच विमी हिची ओळख प्रसिद्ध सिनेनिर्माते बी. आर. चोप्रा यांच्याशी करून दिली. बी. आर. चोप्रा यांनी 'हमराज' सिनेमात संधी दिली आणि विमी रातोंरात सुपरस्टार बनली.
मात्र, या निर्णयाची मोठी किंमत विमीला मोजावी लागली. तिनं सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिला कुटुंबापासून दूर जावं लागलं आणि संपत्तीतूनही बेदखल करण्यात आलं. सासरच्या मंडळींनी विमी आणि तिच्या पतीलाही घरातून बाहेर काढलं. त्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी विमी यांच्या खांद्यावर आली.
विमीचा 'हमराज' सिनेमा ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या. पण, बी. आर. चोप्रा यांच्यासोबत केलेल्या करारामुळे त्या इतर प्रोजेक्ट्स स्वीकारू शकल्या नाहीत. पुढे बी. आर. चोप्रा आणि विमी यांच्यात मतभेद वाढले आणि करार संपुष्टात आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर मिळालेल्या सिनेमांना बॉक्स ऑफिस गाजवता आलं नाही. हळूहळू निर्माते-दिग्दर्शकांनी तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली आणि त्यामुळेच तिचं करिअर उतरणीला लागलं.
आर्थिक अडचणींचा परिणाम विमीच्या वैवाहिक आयुष्यावरही झाला. पती व्यसनांच्या आहारी गेला. त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले आणि परिस्थिती एवढी बिघडली की, दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडला. अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटानंतर विमी मुंबई सोडून कोलकात्यात स्थायिक झाली. तिथे ती जॉली नावाच्या एका फिल्म डिस्ट्रीब्युटरसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. कोलकात्यात तिनं कपड्यांचा व्यवसाय सुरू केलेला, मात्र तोही अपयशी ठरला. हा निर्णयही तिच्या आयुष्यातील अडचणी वाढवणारा ठरला. विमीचं जॉलीसोबतचं नातंही फार काळ टिकलं नाही. या नात्यादरम्यान ती व्यसनांच्या पुरती आहारी गेली. मीडिया रिपोर्टनुसार, जॉलीनं तिला देहविक्रीच्या दलदलीत ढकलल्याचेही आरोपही झाले होते. या सर्व घटनांमुळे विमीचं करिअरच नव्हे, तर तिची प्रकृतीदेखील पूर्णपणे खालावलेली.
आयुष्यातील अपयश आणि वाढत्या एकटेपणामुळे विमी हळूहळू नशेच्या आहारी गेली. कालांतरानं तिची प्रकृती खालावत गेली आणि तिचं संपूर्ण करिअर पूर्णपणे संपुष्टात आलं. आर्थिक अडचणींमुळे तिची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली. त्यातच तिच्या आसपासचे लोकही तिला त्रास देऊ लागल्यानं तिला आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं.
मीडिया रिपोर्टनुसार, 1977 साली अवघ्या 34 व्या वर्षी लिव्हर निकामी झाल्यानं विमीनं या जगाचा निरोप घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील नानावटी रुग्णालयात तिनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, शेवटच्या क्षणी तिच्यासोबत जवळचं कोणीही नव्हतं. तिच्या अंत्ययात्रेला केवळ सुनील दत्त उपस्थित होते, असंही म्हटले जातं.