दहावीचा आज निकाल, अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरु! 'या' संकेतस्थळावर करा अर्ज, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना भरता येणार १० कॉलेजचे प्राधान्यक्रम, वाचा...
esakal May 08, 2026 10:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी प्रथम ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरावा लागणार आहे. दहावीच्या निकालानंतर भाग-दोन म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीची १० महाविद्यालये निवडता येणार आहेत. दहावीचा निकाल उद्या (शुक्रवारी) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर हजारो विद्यार्थी त्यांच्या सोयीच्या महाविद्यालयात इयत्ता अकरावीला प्रवेश घेऊन ‘नीट’, ‘सीईटी’च्या कोचिंग क्लासेसला नियमित हजेरी लावत होते. त्यात मोठी आर्थिक देवाणघेवाण होत होती. महाविद्यालयातील हजेरीपटावरील विद्यार्थी आणि प्रत्यक्षातील उपस्थित विद्यार्थी यांच्यात मोठी तफावत दिसून येत होती. परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील सोयीच्या महाविद्यालयांत प्रवेश घेतल्याची बाबही समोर आली.

या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने गतवर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरून महाविद्यालयांत प्रवेश देण्यात आले. यंदा या प्रक्रियेचे दुसरे वर्ष असून, १० एप्रिलपासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्याची कार्यवाही सुरू आहे. निकालानंतर अर्जाचा दुसरा भाग भरून घेतला जाईल. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावीत, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

निकालानंतर विद्यार्थ्यांना भरता येतील महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. १० एप्रिलपासून राज्यातील सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आता बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीची महाविद्यालये म्हणजेच प्राधान्यक्रम निवडता येतील.

- डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक शिक्षण

प्रवेश क्षमता पाहूनच महाविद्यालय निवडावे

अनेकदा कनिष्ठ महाविद्यालये त्यांच्याकडील प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपण प्रवेश घेत असलेल्या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता तपासावी. त्यानंतरच त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश निश्चित करावा. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरीचे बंधन असून, वर्षातील किमान २०० दिवस त्यांची उपस्थिती बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना म्हणजेच महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम निवडताना या बाबींचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन सचिन जगताप यांनी केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.