>>वर्णिका काकडे
भिल्ली भाषा ही प्रामुख्याने पश्चिम-मध्य भारतातील भिल्ल जमातीद्वारे बोलली जाणारी आर्यवंशीय (उदा. झाड एवजी ‘चाड’) भाषा आहे, जिचा विस्तार गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील डोंगराळ भागात आहे. ही मराठी, गुजराती आणि राजस्थानीच्या प्रभावाखालील एक मिश्र बोली असून, तिचे मौखिक साहित्य, लोकगीते आणि निसर्गशरण संस्कृती वैशिष्टय़पूर्ण आहे.
भिल्ली भाषा अनेक आहेत. त्यांतील प्रत्येकीचे स्वरूप ती ज्या शेजारच्या महत्त्वाच्या आर्यभाषेच्या प्रभावाखाली आली, तिच्यामुळे वैशिष्टय़पूर्ण बनले आहे. या महत्त्वाच्या भाषा गुजराती, मराठी, राजस्थानी व हिंदी या आहेत. कित्येक ठिकाणी एखादी भिल्ल बोली दोन आर्यभाषांच्या दरम्यान आढळते. जसे गुजराती व मराठी किंवा गुजराती व राजस्थानी यांच्या सीमावर्ती भाषांमुळे या भाषेचे स्वरूप संमिश्र बनते.
ही प्रामुख्याने नंदुरबार, धुळे (महाराष्ट्र), दक्षिण गुजरात, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात बोलली जाते. भिल्ली भाषेला स्वतची स्वतंत्र लिपी नाही; ती प्रामुख्याने देवनागरी लिपीत लिहिली जाते. या भाषेत ‘ळ’, ‘ष’, ‘क्ष’ चा वापर दुर्मिळ असून अनेकदा ‘श’, ‘ष’ च्या जागी ‘ह’ चा वापर केला जातो (उदा. झाड ऐवजी ‘चाड‘) भिल्ली/ भिलोरी भाषेच्या अनेक उपभाषा आहेत. त्यांपैकी पावरी भिल्ली, कोटली भिल्ली, राणी भिल्ली, मावची भिल्ली इत्यादी काही प्रमुख होत. अशा भिल्ली भाषेच्या 36 बोली समजल्या जातात.
भिल्ली साहित्य हे प्रामुख्याने मौखिक स्वरूपाचे आहे, ज्यामध्ये लोकगीते, कथा, आणि म्हणींमधून भिल्ल संस्कृतीचे दर्शन घडते. भिल्ल समाज निसर्गपूजक असल्याने त्यांच्या बोलीभाषेत निसर्ग, शेती आणि शिकारीशी संबंधित शब्दसंपदा अधिक आढळते. ही भाषा ‘भिल बोली’ या नावानेही ओळखली जाते आणि ती भिल्ल जमातीची ओळख मानली जाते.
भिल्ली भाषा जतन करण्यासाठी आता डिजिटल व्यासपीठांवर ‘भीली शब्दकोश’ अॅप्स उपलब्ध झाले असून, त्यांच्या मदतीने शब्द, प्रतिमा आणि उच्चार शिकता येतात. अवघड शब्दसंपदा, लोकगीते, म्हणी, वाक्प्रचार यामुळे भिल्ली संस्कृती आणि बोली वैशिष्टय़पूर्ण ठरते.
महाराष्ट्रातील बोलीभाषांची अवस्था आज अतिशय केविलवाणी आहे. संवाद सुकर होण्यासाठी बोली बोलताना अस्सल शब्द मुद्दाम टाळले जातात व परिस्थितिशरण शब्द वाक्यात टाकले जातात. याला बोली बोलणाऱयांच्या मनात असलेला न्यूनगंड कारणीभूत आहे. खरं तर जगातील कोणतीच भाषा शुद्ध नाही आणि अशुद्धही नाही. भाषा फक्त भाषाच असते, जिच्याद्वारे आपण संवाद साधू शकतो.