Nashik Crime News: नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) प्रकरण ताजे असतानाच आता इगतपुरी परिसरात वनविभागाने एका भोंदू बाबावर धडक कारवाई करत त्याच्या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश केला आहे. इगतपुरी तालुक्यातील गिरणारे (बनवाडी) येथील चंद्रकांत राजेंद्र माळी (वय 33) याला वनविभागाच्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आले आहेत.
इगतपुरी वनविभागाला गिरणारे परिसरात एक तरुण भोंदूगिरी करून वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी किंवा वापर करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून आरोपीच्या घरावर छापा टाकला.
कारवाई दरम्यान एक धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला. वनविभागाचे अधिकारी जेव्हा अधिकृत सर्च वॉरंट घेऊन आरोपीच्या घरी पोहोचले, तेव्हा स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आणि कारवाईत अडथळा आणण्यासाठी आरोपी चंद्रकांत माळी याने चक्क वनविभागाचे 'सर्च वॉरंट'च तोंडात टाकून चावून खाऊन टाकले. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन घराची झडती घेतली.
आरोपीच्या घरातून वनविभागाला वन्यजीवांच्या अवयवांचा मोठा साठा मिळून आला. यामध्ये रानडुकराचे दात, सांबर आणि काळवीटाची शिंगे, घुबडाचे अवयव, सालिंदरचे काटे, मोरपिसे आणि एका तलवारीचा समावेश आहे. या जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 2 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
वनविभागाने आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या भोंदू बाबाकडे हे वन्यजीवांचे अवयव कोठून आले आणि यात अजून कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा अधिक तपास वनविभाग करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या