>> दुष्यंत पाटील, dush.patil@gmail.com
एक्सप्रेशनिझम चळवळीला जन्म देणारे आणि दिशा देणारे ‘द क्रीम’ हे चित्र. या चळवळीतला चित्रकार एडवर्ड मंच याचे हे चित्र म्हणजे स्वतच्याच दुःखाला करून दिलेली वाट. हे चित्र आजही चित्रविश्वात एक प्रमाणक ठरते.
‘एक्सप्रेशनिझम’ ही पाश्चात्त्य कलेच्या इतिहासातली एक अतिशय महत्त्वाची चळवळ होती. एक्सप्रेशनिझममध्ये एखादी गोष्ट जशी डोळ्यांना दिसते तशी न दाखवता ती आपल्याला हृदयाला कशी भावते ते दाखवलं जायचं. एडवर्ड मंच हा चित्रकार या चळवळीतल्या सर्वात महत्त्वाच्या कलाकारांपैकी एक.
एडवर्ड मंच (1863-1944) हा नॉवदेशातला. त्याचं बालपण अतिशय वाईट प्रकारे गेलं. बालपणी आई, मोठ्या बहीणीचा मृत्यू याने मंचच्या मनावर खोल परिणाम झाला. त्याची एक बहीण मनोरुण होती तर त्याचे वडीलही सतत मृत्यू, पाप आणि नरक अशा विषयांवरच बोलायचे. मंचनं आयुष्यावर आधारित अशा ‘द फ्रीझ ऑफ लाईफ’ नावाच्या एका चित्रमालिकेची निर्मिती केली. या चित्रमालिकेत त्यानं प्रेम, चिंता, एकटेपणा, भय असे जीवनात महत्त्वाचे असणारे विषय मांडले. मंचनं या चित्रांमधून काय दिसतंय ते दाखवण्याऐवजी त्याला भावलं ते दाखवलं. यातलं गाजलेलं चित्र म्हणजे ‘द क्रीम’ म्हणजे किंकाळी.
‘द क्रीम’ या चित्रात एक मुख्य व्यक्ती दिसते. ती पुरुष आहे की स्त्राr हे स्पष्ट दिसत नाही. ही व्यक्ती थोडीशी विचित्र, जवळपास भुतासारखी दिसते. या व्यक्तीनं कानावर हात धरलेले आहेत. हात गालावर ठेवून, तोंड उघडलेलं. जणू काही ही व्यक्ती किंचाळतेय. या व्यक्तीनं तोंड उघडलंय तर डोळे विस्फारलेले आहेत. चेहरा काहीसा कवटीसारखा दिसतोय.
पार्श्वभूमीला रक्तानं माखल्यासारखं लाल-नारिंगी रंगाचं आकाश दिसतंय. या आकाशात लाटा दिसतात, त्यात एका प्रकारची गती असल्यासारखं वाटतं. तसंच खाली निळ्या, काळ्या रंगाची समुद्राची खाडी दिसते. ज्या रस्त्यावर चित्रातली मुख्य व्यक्ती ‘किंचाळत’ असल्यासारखी दिसतीये, त्याच रस्त्यावर मागे दोन व्यक्ती चालताना दिसत आहेत. ते एकमेकांशी बोलण्यात मग्न आहेत असं दिसतं. त्यांना ‘किंकाळी’नं काहीही फरक पडत नाहीये.
हे चित्र मंचच्या आतल्या भीतीचं आहे. बालपणी आई-बहीण गमावल्यामुळे मृत्यूची भीती, बहिणीच्या वेडामुळे स्वत वेडा होण्याची भीती, एकटेपणा. घरात सतत दुःखमय वातावरण आणि मृत्यू, पाप आणि नरक यांची चर्चा. या सगळ्या घटनांमुळे मंचचं मनोविश्व जखमी, रक्तबंबाळ झालेलं होतं. त्यामुळे त्यानं चित्रातलं आकाश रक्तासारखं दाखवलंय. हे सगळं असह्य होऊन चित्रातली मुख्य व्यक्ती किंचाळत आहे. दुसऱया अर्थानं बघायला गेलं तर असंही वाटतं की, चित्रातली व्यक्ती किंचाळत नाहीये, तर निसर्गातून ऐकू येणाऱया ‘किंकाळी’चा (म्हणजे आयुष्यात घडणाऱया घटनांचा) आवाज असह्य झाल्यानं या व्यक्तीनं कानावर हात ठेवलेत.
खरे तर हे चित्र मंचच्या वैयक्तिक आयुष्याचे नाही. आपल्या सर्वांनाच या ‘किंकाळी’चा अनुभव आयुष्यात कधी ना कधी येत असतो. मंचनं हा अनुभवच कॅनव्हासवर आणलाय. आपल्याला ‘किंकाळी’चा अनुभव येताना इतर लोक मात्र आपल्याच विश्वात मग्न असतात.
‘द क्रीम’ (1893) हे चित्र एक्सप्रेशनिझम या कलाचळवळीचं प्रेरणास्रोत मानलं जातं. हे चित्र स्वत एक्सप्रेशनिझम चळवळीचा भाग नाही. कारण ही चळवळ नंतरच्या काळात आली, पण हे चित्र एक्सप्रेशनिझम चळवळीला जन्म देणारं आणि दिशा देणारं ठरलं.