आरसीबीच्या कोचवर दंडात्मक कारवाई! कृणाल पांड्या आहे जबाबदार; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
Marathi May 11, 2026 10:25 PM

रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध 2 विकेट्सने विजय मिळवला. पण त्या सामन्यादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कोचला मात्र फटका बसला आहे. आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना दंड ठोठावण्यात आला असून, त्यांच्या सामना शुल्कात 15 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आयपीएल 2026 मधील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या हंगामात आतापर्यंत केवळ खेळाडू किंवा संघाच्या कर्णधारांनाच दंड ठोठावण्यात आला होता. संघाच्या मुख्य प्रशिक्षकांना देण्यात आलेली ही पहिलीच शिक्षा आहे, पण नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव करत प्लेऑफच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलं. मुंबईला पराभूत केल्यानंतर आरसीबीचा संघ १४ गुणांसह आणि कमालीच्या नेट रन रेटसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आता आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठी फक्त एकच सामना जिंकायचा आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेबाहेर झाला आहे.

आता प्रश्न असा आहे की, अँडी फ्लॉवर यांना दंड का ठोठावण्यात आला? याचं कारण म्हणजे पंचांशी घातलेली हुज्जत. आरसीबीच्या डावाच्या १८ व्या षटकादरम्यान कोच अँडी फ्लॉवरचा चौथ्या पंचांसोबत जोरदार वाद झाला. परिणामी, त्यांना दंड ठोठावण्यात आला. आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, अँडी फ्लॉवरने आपला गुन्हा कबूल केला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.३ अंतर्गत त्यांना दोषी ठरवण्यात आलं.

हा संपूर्ण प्रकार कृणाल पांड्याच्या संबंधित एका वादग्रस्त बाउंड्रीच्या निर्णयानंतर घडला. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज अल्लाह गझनफरच्या गोलंदाजीवर कृणालने चेंडू लाँग-ऑनच्या दिशेने खेळला. तिथे उपस्थित असलेल्या नमन धीरने सीमारेषेजवळ चेंडू पकडला. तिलक वर्मादेखील तिथे उपस्थित होता. पण नमनचा सीमारेषेबाहेर तोल जाणार कळताच त्याने चेंडू फेकला, पण तिलक तो चेंडू टिपू शकला नाही.

दरम्यान, नमनचा एक बूट चुकून दुसऱ्या बुटाला लागून सीमारेषेवरील कुशनला लागला असावा, त्यामुळे षटकार देण्यात आला पाहिजे असं अँडी फ्लॉवरचं म्हणणं होतं. पण, रिप्लेमध्ये दिसलं की, प्रयत्नादरम्यान नमन धीरने कुशनला स्पर्श केला नव्हता. कृणालला क्रॅम्प येत असल्यामुळे त्याने धावण्याचा प्रयत्न केला नाही. याचा अर्थ तो निर्धाव चेंडू होता.

दरम्यान, अँडी फ्लॉवरचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते पंचांशी रागाने बोलताना दिसत आहेत. सामन्यानंतर, फ्लॉवर यांनी चौथ्या पंचांशी रागाने बोलण्याची आपली चूक कबूल केली आहे आणि सामनाधिकारी अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, लेव्हल १ उल्लंघनासाठी दिलेली शिक्षा अंतिम आणि बंधनकारक असते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.