भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhna) अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या शानदार कामगिरीबद्दल तिचे कौतुक केले जाते, तर कधी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. स्मृतीला वारंवार सोशल मीडियावर ‘बॉडी शेमिंग’ला सामोरे जावे लागते. आता स्मृतीने आपल्या उत्तराने टीकाकारांची बोलती बंद केली आहे, ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सोशल मीडियावर ट्रोलर्स स्मृतीचे फोटो शेअर करून तिला ट्रोल करतात. विशेषतः तिची ‘जिम बॉडी’ पाहून अनेकजण कमेंट्स करतात. यावर स्मृतीने आता उघडपणे भाष्य केले असून ती म्हणाली, “जेव्हा मी ‘शोल्डरलेस’ (विना शोल्डरचे) ड्रेस घालते, तेव्हा लोक मला माझ्या शरीरयष्टीवरून ट्रोल करतात. माझ्या चांगल्या मसल्सवर टीका केली जाते.
माझ्या मते, ही विचारसरणी चुकीची आहे. एक खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणून चांगले स्नायू असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही जिममध्ये कठोर परिश्रम करता, तेव्हाच तुमचे स्नायू मजबूत होतात. मी भारतासाठी खेळते, त्यामुळे जर मला मैदानात चांगली कामगिरी करायची असेल, तर मला माझ्या फिटनेसवर मेहनत घ्यावीच लागेल. लोकांच्या टीकेपेक्षा माझ्यासाठी माझी चांगली कामगिरी अधिक महत्त्वाची आहे.
स्मृती मानधना तिचा ‘लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड’ पलाश मुच्छलसोबत विवाहबंधनात अडकणार होती. 23 नोव्हेंबरला हा विवाह सोहळा महाराष्ट्रातील सांगली येथे पार पडणार होता. मात्र, लग्नाच्याच दिवशी हा सोहळा रद्द करण्यात आला. शेवटच्या क्षणी काही कौटुंबिक कारणे आणि वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या वर्षीच्या महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 (ODI World Cup 2025) मध्ये स्मृतीने चमकदार कामगिरी केली होती आणि भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. तिने 9 सामन्यांच्या 9 डावांत 54.25 च्या सरासरीने 434 धावा फटकावल्या होत्या. यामध्ये तिने 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली होती. स्मृतीने भारतासाठी आतापर्यंत 8 कसोटी सामन्यांमध्ये 48.84 च्या सरासरीने 635 धावा केल्या आहेत. तसेच, 120 एकदिवसीय (ODI) सामन्यांमध्ये तिने 47.88 च्या सरासरीने 5411 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त 163 टी-20 सामन्यांमध्ये तिने 30.23 च्या सरासरीने 4293 धावा आपल्या नावावर केल्या आहेत.