मुंबई : सर जे. जे. रुग्णालय परिसरातील डॉक्टर निवास येथे राहणाऱ्या एका निवासी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. मृत डॉक्टरचे नाव डॉ. अभयसिंग नरसिंग मोरे (वय 26) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मोरे हे सर जे. जे. रुग्णालय संकुलातील नर्सिंग हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरील रूम क्रमांक 604 मध्ये राहत होते. ते रेडिओलॉजी विभागाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले.
डॉ. मोरे यांचे मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसेमगाव असून, ते काही काळापासून मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते व संबंधित औषधेही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात सुमारे 1200 फूट खोल दरीत राजाराम रघुनाथ कुडतरकर या डंपर चालकाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. एक डंपर घाटात उभा असल्याने डंपरमालक मायकल डिसोजा यांना संशय आल्याने त्यांनी ड्रोनद्वारे घाटातील दरीत पाहणी केली असता कुडतरकर याचा मृतदेह सुमारे 1200 खोल दरीत आढळून आला. सह्याद्री एडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमने खोल दरीत उतरून मृतदेहवर काढला.