ब्राझीलमधील एका रुग्णालयातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 88 वर्षीय जुरासी रोजा आल्वेस यांना 16 मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता, काही दिवसांनी त्याला डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर अंतिम संस्काराच्या प्रक्रियेसाठी त्यांचा मृतदेह शवागारात पाठवण्यात आला. मात्र अंत्यविधीची तयारी सुरू असताना सर्वांनाच हैराण करणारी घटना घडली. यामुळे डॉक्टरही हैराण झाले, नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नेमकं काय घडलं?88 वर्षीय जुरासी रोजा आल्वेस यांच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना तिथल्या एका कर्मचाऱ्याने त्या मृतदेहाचा श्वास सुरू असल्याचे पाहिले. यानंतर तातडीने रुग्णालयाला माहिती देण्यात आली. डॉक्टर घटनास्थळी पोहोचले आणि ज्यांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले होते, ते डॉक्टरही तपासासाठी आले. ही घटना पाहून डॉक्टरही चकित झाले. त्या व्यक्तीच्या शरीरात हालचाल जाणवत होती. वृद्ध व्यक्ती श्वास घेत असल्याचे पाहून शवागारातील कर्मचारी हादरले. त्यानंतर त्यांना तातडीने पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले.
अंतिम संस्कारापूर्वी चमत्कारअंत्यसंस्कार गृहाच्या तांत्रिक नर्सिंग सुपरवायझर जॅकलीन ब्रोगियाटो यांनी याबाबत स्थानिक माध्यमांना सांगितले की, ‘आमच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे मृतदेहाची तपासणी केली. जेव्हा मृतदेह टेबलावर ठेवण्यात आला, तेव्हा पोटात असामान्य हालचाल दिसली. तो श्वास घेत आहे की नाही, याबाबत सुरुवातीला खात्री नव्हती. जेव्हा आम्हाला त्याच्यात जिवंत असल्याची चिन्हे दिसली, तेव्हा त्याला वाचवणे हेच आमचे पहिले उद्दिष्ट होते. त्यामुळे आपत्कालीन सेवा येईपर्यंत मी त्याच्या श्वसनमार्गाची साफसफाई करून प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी तातडीने त्यांना बेशुद्ध करून इंट्यूबेट केले, जेणेकरून त्यांना पुन्हा आरोग्य केंद्रात नेले जाऊ शकेल.’
उपचार सुरूजुरासी रोजा आल्वेस यांना यानंतर त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर आधी उपचार सुरू होते. या प्रकरणाची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, त्यांनी याची निष्काळजीपणाच्या प्रकारात नोंद केली आहे. मात्र पोलिसांनी ज्या डॉक्टरने आल्वेस यांना मृत घोषित केले होते, त्याची ओळख जाहीर केलेली नाही. सध्या आल्वेस गंभीर पण स्थिर अवस्थेत ICU मध्ये इंट्यूबेट अवस्थेत उपचार घेत आहेत.
या घटनेबाबत आल्वेस यांच्या एका नातेवाईकाने सांगितले की, ‘माझी आत्या त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक कागदपत्रे आणि कपडे आणण्यासाठी घरी गेली होती. त्यानंतर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले की, मृतदेह शवागारात नेण्यात आला होता आणि तिथे कर्मचाऱ्यांना आल्वेस यांच्यात जिवंत असल्याची चिन्हे दिसली. ते श्वास घेत होते आणि हलतही होते. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.