Tumbadchi Manjula Trailer: सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला, आपल्या पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या 'तुंबाडची मंजुळा' (Tumbadchi Manjula) सिनेमाचा ट्रेलर (Movie Trailer) प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्यातून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच जास्त वाढली आहे. रहस्य, भीती , गुढता आणि त्याच्या सोबतीला एकाहून एक अतरंगी गावकऱ्यांची धमाल गोष्ट या ट्रेलरमधून बघायला मिळत असल्याने एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपटाची मेजवानी मिळणार असल्याची चर्चा प्रेक्षक सोशल मीडियावर करत आहेत.
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर अनेक मान्यवरांच्या आणि कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटात आजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांच्या निवेदनातून आपण या गावात आणि त्या विश्वात प्रवेश करतो. या ट्रेलरमध्ये गावाची आणि तिथल्या व्यक्तिरेखांची ओळख करून देताना त्यांच्या खास शैलीतील निवेदनामुळे ट्रेलरला एक वेगळीच रंगत आली आहे. यामध्ये एक गाव, त्यातील गावकरी, त्यांच्यावर घोंगावणारं एक अदृश्य संकट आणि त्यातून घडणाऱ्या असामान्य घटनांची झलक पाहायला मिळते. जरी चित्रपटाला भयपटाची पार्श्वभूमी असली, तरी हा चित्रपट निखळ विनोद आणि भरभरून मनोरंजनाचा अनुभव देणारा असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होतं.

मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure), जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) , ओम भुतकर (Om Bhutkar), अंशुमन विचारे (Anshuman Vichare), योगेश शिरसाट (Yogesh Shirsat), गणेश पंडीत (Ganesh Pandit), शार्दूल सराफ (Shardul Saraf) यांच्यासोबत इतर कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, विनोदाचं अचूक टायमिंग, सोबतीला असलेले भन्नाट संवाद यातून या गोष्टीची आणि या गावाची अतरंगी झलक आपल्या बघायला मिळते. पण सोबतीनेच ट्रेलरच्या उत्तरार्धात एका गुढ वलयात दिसणारी सई ताम्हणकर सर्वांचं लक्ष वेधून घेते. तिचं नेमकं पात्र काय आहे ?तिच्या गुढतेमागची गोष्ट काय आहे ? असा विचार हा ट्रेलर बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात येतो आणि या कथेबद्दलची उत्कंठा वाढवतो. रहस्य उलगडण्याच्या प्रवासात प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवण्यात ट्रेलर यशस्वी ठरताना दिसत आहे.
दिग्दर्शक विविध कोरेगांवकर म्हणतात, "करीअरच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करायची संधी मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे. झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी माझ्यावर विश्वास टाकत ही संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या आणि अनोख्या विश्वात घेऊन जाणारा अनुभव आहे. हा चित्रपट तयार करताना आम्ही प्रत्येक पात्र, त्याची शैली आणि प्रत्येक प्रसंग वेगळ्या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधून आम्ही एक छोटीशी झलक दाखवली आहे. 'तुंबाडची मंजुळा' प्रेक्षकांना नक्की आवडेल, याची आम्हाला खात्री आहे..."
झी स्टुडियोजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, "तुंबाडची मंजुळा हा खऱ्या अर्थानं पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला चित्रपट आहे त्यामुळे आमच्यासाठी त्याचं विशेष महत्त्व आहे. आपल्या प्रेक्षकांना एक परीपूर्ण मनोरंजन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकाहून एक दिग्गज कलाकार , गुढता आणि रहस्याभोवती फिरणाऱ्या गोष्टीला दिलेला विनोदाचा तडका , श्रवणीय संगीत असे मनोरंजनाचे विविध पैलू यात प्रेक्षकांना बघायला मिळतील. सध्या प्रेक्षकांना मनोरंजनासोबत काहीतरी वेगळं आणि ताजं पाहायचं आहे आणि हा चित्रपट त्याच अपेक्षांवर नक्कीच खरा उतरेल, असा विश्वास आम्हाला आहे. रहस्य, विनोद आणि कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री यामुळे हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटेल..."
दरम्यान, रहस्य, विनोद आणि दमदार कथानकाची मेजवानी घेऊन येणारा 'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट आता 5 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. विविध कोरगांवकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आणि लेखन ऋषिकेश तुरई यांनी केले असून झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली आहे.
'तुंबाडची मंजुळा'चा ट्रेलर पाहिलात?
ABP माझाच्या बातम्या LIVE...