पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ गरीबनगर इथल्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत 90 टक्के बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 2021 च्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या झोपडपट्टीधारकांना वगळून इतर सर्व अनधिकृत बांधकामं हटवण्यास पश्चिम रेल्वेला परवानगी दिली होती. या तोडक कारवाईनंतर गरीबनगरमध्ये राहणारे अनेकजण बेघर आणि बेरोजगार झाले आहेत. यामध्ये अनेक बालकलाकारांचाही समावेश आहे.
शेकडो कुटुंब बेघर‘न्यूज 9 डिजिटल’ने कास्टिंग को-ऑर्डिनेटर परवेझ शेख यांच्याशी यासंदर्भात संवाद साधला. गरीबनगरमधील तोडक कारवाईमुळे शेकडो कुटुंब बेघर झाली असून बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या मुलांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालं आहे, याविषयी त्यांनी सविस्तर सांगितलं. ते म्हणाले, “त्या परिसरात 100 मुलं होती, त्यापैकी अनेकजण माझ्यासोबत काम करायची. काहीजण 25 वर्षांचीही होती. तोडक कारवाईचा त्यांच्या कामावरही परिणाम झाला आहे. त्यांना काम मिळालं तर शूटिंगमधून ते फक्त 500 रुपये कमवायचे. आता त्यांच्या डोक्यावर राहायला छतही नाही.”
‘स्लमडॉग मिलियनेअर’मधील बालकलाकार“ही लहान लहान मुलं आता रस्त्यावर झोपत आहेत. 500 घरांपैकी फक्त 140 घरांचं सर्वेक्षण झालं होतं. माझंही घर त्या 140 घरांमध्ये पाडण्यात आलं आहे. आम्ही आमच्या घरातील सर्व सामान घेऊन बाहेर पडलो”, असं त्यांनी पुढे सांगितलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या काही लहान मुलांनी ‘स्लमडॉग मिलियनेअर’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. या चित्रपटात सलिम आणि लतिका यांच्या भूमिका गरीबनगरमध्ये राहणाऱ्या अझरुद्दीन इस्माइल आणि रुबिना अली यांनीच साकारल्या होत्या. ‘स्लमडॉग मिलियनेअर’च्या प्रचंड यशानंतर या मुलांचं राहणीमान आणि परिस्थिती काही बदलली नाही.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने मंगळवारी वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर परिसरातील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम हाती घेतली. त्यात मंगळवारी 400 पैकी 20 टक्के आणि बुधवारी एकूण 60 टक्के पाडकाम करण्यात आलं. यावेळी प्रार्थनास्थळावर कारवाई झाल्यानंतर स्थानिक जमावाने संताप व्यक्त करत पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.