काँग्रेसवर आता विश्वास ठेवणार नाही : स्टॅलिन
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या राजकारणाच्या बदलत्या स्वरुपादरम्यान द्रमुकच्या युवा शाखेचे प्रमुख उदयनिधी स्टॅलिन यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे. आम्ही काँग्रेसवर पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसने निवडणुकीत लाभ उचलल्यावर द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे उदयनिधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे.
20 वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत काँग्रेस आमच्या पाठीवर सवार राहिला. आता त्याने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असून त्याचे हे कृत्य कुणीच विसरणार नाही. भविष्यात कुठल्याही स्थितीत काँग्रेसवर विश्वास ठेवणार नाही आणि पुन्हा कधीच त्याला आमच्यानजीक येऊ देणार नसल्याचे उदयनिधी यांनी म्हटले आहे.
भाजपला सातत्याने निवडणुकीत मिळणाऱ्या यशासाठी थेट स्वरुपात काँग्रेसच जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपच्या सततच्या विजयासाठी मुख्य कारण असल्याचे पूर्वी वाटत होते. परंतु आता माझे हे मत बदलले आहे. भाजपच्या विजयाचे सर्वात मोठे कारण काँग्रेस पक्ष असल्याचे आता पूर्णपणे स्पष्ट झाले असल्याची कठोर टीका स्टॅलिन यांनी केली आहे.
द्रमुकच्या मदतीमुळे मिळाल्या जागा
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत द्रमुकने आघाडीधर्म पूर्ण निष्ठेने पाळला. द्रमुक कार्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्षतेचे रक्षण आणि तामिळनाडूत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी घाम गाळला. या निवडणुकीतही जवळपास अस्तित्वहीन ठरलेला काँग्रेस केवळ द्रमुक कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीमुळेच 5 जागा जिंकू शकला. परंतु काँग्रेसने निकालानंतर त्वरित सत्तेसाठी पळ काढला आणि शिष्टाचाराच्या अंतर्गत कळविणे देखील आवश्यक समजले नाही. काँग्रेसमदेय राजकीय शालीनता तसेच कृतज्ञताही शिल्लक राहिलेली नाही. तामिळनाडूची जनताच आता काँग्रेसला धडा शिकविणार असल्याचा दावा उदयनिधी यांनी केला.
टीव्हीके सरकार लक्ष्य
टीव्हीकेचे सरकार सत्तेवर आल्यापासून तामिळनाडूतील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यात हत्या, लूट आणि लैंगिक शोषणाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. मागील 13 दिवसांमध्ये 30 हून अधिक हत्या, लूट आणि लैंगिक गुन्हे घडल्याचा दावा द्रमुकने केला आहे.