स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचा बळी अन् 2 एकर जमीन हडपली; अशोक खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंद
Marathi May 26, 2026 01:25 PM

नाशिक क्राईम न्यूज : नाशिकचा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अटकेनंतर आणखी एका भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आश्रम आणि मठ स्थापन करून, विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांचे शोषण करणाऱ्या कमलेश शिवकुमार अधिकारी (Kamlesh Shivkumar Adhikari) आणि त्याच्या पत्नीविरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Anis) प्रयत्नांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Crime News: काय आहे नेमके प्रकरण?

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील लऊळ येथील मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर या दोन पीडित भावांच्या आई-वडिलांचे २०२१ मध्ये अवघ्या एका महिन्याच्या अंतराने निधन झाले होते. या अचानक झालेल्या मृत्यूमुळे दोन्ही भाऊ प्रचंड मानसिक दडपणाखाली आणि भीतीच्या छायेत जगत होते. यावर काहीतरी आध्यात्मिक किंवा दैवी तोडगा मिळावा म्हणून त्यांनी शोध सुरू केला. यादरम्यान त्यांना यूट्यूबवर नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील भोंदूबाबा कमलेश अधिकारी याची माहिती मिळाली.

Nashik Crime News: स्मशानभूमीत अघोरी पूजा आणि पशूंचा बळी

दोन्ही भावांनी नाशिक गाठून कमलेश अधिकारीची भेट घेतली. याचा फायदा घेत भोंदूबाबानं त्यांच्या मनाचा ताबा मिळवला. “तुमच्या कुटुंबाचे मागच्या जन्मीचे पाप आहे, तुम्ही राहत असलेल्या जमिनीत दैवी दोष आहे. तिथे गुप्तधनाचा साठा असून अतृप्त आत्म्यांनीच तुमच्या आई-वडिलांचा बळी घेतला आहे. आता तुम्हा दोघांवरही मृत्यूयोग आहे,” अशी भीती त्याने देवकर बंधूंना दाखवली.

यानंतर भोंदूबाबानं त्यांना मध्यप्रदेशातील उज्जैन (Ujjain) येथे बोलावून घेतले. तिथल्या स्मशानभूमीत जळत्या चितेवर चार दिवस अघोरी पूजा करण्यात आली. या पूजेदरम्यान पशूंचा बळी देण्यात आला आणि या नावाखाली 1 लाख 50 हजार रुपये उकळले. त्यानंतर नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमात पुन्हा अघोरी पूजा करून प्राण्यांचा बळी देण्यात आला आणि पीडितांना दारू प्रसाद म्हणून देण्यात आली.

Nashik Crime News: जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

एवढ्यावरच न थांबता या भोंदूबाबानं दोन्ही भावांना त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील आश्रमात बळजबरीने डांबून ठेवले. त्यांच्याकडून घरगुती कामे करून घेत त्यांचे विविध प्रकारे शोषण केले. तसेच स्वतःचा मठ बांधण्याच्या बहाण्याने त्यांची दोन एकर शेतजमीन फसवणूक करून परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतली. या संपूर्ण गुन्ह्यात भोंदूबाबा कमलेश अधिकारी याला त्याची पत्नी देखील मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Nashik Crime News: अंनिसच्या पुढाकाराने पोलिसांत धाव

या जाचाला कंटाळून सोलापूरच्या या दोन पीडित भावांनी नाशिक येथील अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पीडितांना धीर देत इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी भोंदू कमलेश अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास (Investigation) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करत आहेत. या भोंदूबाबानं अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी थेट अंनिस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Nashik Crime News: अधिकारी बनून ‘तोतया’ कारागृहाच्या आवारात गेला, पीएल ग्रुपच्या टोळीला मदत? लाल दिव्याच्या गाडीतील गौरव मिश्राचा भांडाफोड

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.