ड्रग्जमाफियाविरोधात तक्रार केल्याच्या रागातून कुटुंबावर हल्ला, कल्याणच्या मच्छी मार्केटमधील घटना; पती, पत्नीसह मुलगा गंभीर जखमी
Marathi May 26, 2026 01:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चरस, गांजा विकणाऱ्या ड्रग्जमाफियाविरोधात तक्रार केल्याच्या रागातून कुटुंबावरच धारदार शस्त्रे व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज कल्याणच्या मच्छीमार्केट भागात घडली. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यामध्ये पती, पत्नीसह १४ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या हल्ल्या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कल्याणमधील मच्छी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री केली जाते. याच भागात एका अल्पवयीन मुलीचीही छेड काढण्यात आली होती. तसेच अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात त्याच ठिकाणी राहणारे मुदस्सर काझी यांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या. ड्रग्जमाफिया असलेला अमजद पठाण हा फरार झाला होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली. त्यामुळे ड्रग्जमाफियाचा साथीदार व त्याच्या कुटुंबीयांचा काझी यांच्यावर राग होता, असा आरोप करण्यात आला आहे. कल्याणमधील मच्छीमार्केटचा परिसर ड्रग्ज माफियांचा अड्डा बनला असून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

प्रकृती चिंताजनक

याच रागातून आज दुपारी ८ ते १० जणांच्या टोळक्याने मुदस्सर काझी यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला आधी बेदम मारहाण केली. तिला वाचवण्यासाठी मुदस्सर काझी व त्यांचा मुलगा हे धावून गेले. पण दोघांवरही धारदार शस्त्रे व लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये काझी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पत्नीच्या हाताला व मुलाच्या पाठीवरही वार करण्यात आले आहेत. तिघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी संरक्षण न दिल्याचा आरोप

मच्छी मार्केटमधील ड्रग्जमाफिया अमजद पठाण याच्याबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने मुदस्सर काझी यांच्या कुटुंबावर राग तर होता, पण काझी यांना संरक्षण देण्यात आले नाही, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.