नवीन पटनायक यांच्या सहाय्यकाचा राजीनामा
Marathi May 26, 2026 01:25 PM

बीजेडीमधून आता भाजपच्या वाटेवर

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

बिजू जनता दलाला (बीजेडी) सोमवारी मोठा धक्का बसला. बीजेडीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार देबाशीष सामंतराय यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. आता ते बीजेडीमधून बाहेर पडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

देबाशीष सामंतराय यांनी पक्षात आपला अपमान झाल्याचा आरोप केला. ‘मी नेहमीच स्वत:ला पक्षाच्या हितासाठी समर्पित केले आहे. अनेक वर्षांपासून पूर्ण निष्ठा आणि वचनबद्धतेने पक्षासाठी काम केले आहे. तरीही, अलीकडच्या काळात पक्षनेतृत्त्वाकडून माझ्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जात होते, असे त्यांनी आपल्या राजीनामापत्रात लिहिले आहे. पक्षाला आता माझ्या सेवेची आवश्यकता नसल्यामुळे मी जनहितासाठी हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.