फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून शूटिंगच्या काही दिवस आधी अचानक माघार घेतल्याने अभिनेता रणवीर सिंहवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) बंदीचे आदेश दिले आहेत. रणवीरच्या या निर्णयामुळे फरहानला जवळपास 45 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे. यामुळे त्याने फेडरेशनकडे तक्रार केली. यानंतर फेडरेशनने थेट रणवीरवर इंडस्ट्रीत बंदी घालण्याचे आदेश दिले. या आदेशाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि चाहत्यांनीही सोशल मीडियावर विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आता अभिनेता मनोज वाजपेयीने या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला मनोज वाजपेयी?मनोज वाजपेयी आगामी ‘गव्हर्नर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात उपस्थित होता. यावेळी त्यालारणवीर सिंहबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “मला रणवीर आणि एक्सेल एंटरटेन्मेंट यांच्यातील सध्याच्या वादाबद्दल फारशी स्पष्टता नाही. मी तुम्हाला सांगतो की इंडस्ट्रीतील लोक या सर्व गोष्ट फक्त सोशल मीडियावर वाचत आहेत आणि आमच्याकडे त्याबद्दल सविस्तर माहितीच नाही. पण सहकारी किंवा इंडस्ट्रीतील सदस्य म्हणून आम्हाला एवढीच आशा आहे की हे प्रकरण लवकरच सुटेल”, असं उत्तर मनोज वाजपेयीने दिलं.
संजय गुप्ता यांचा FWICE ला सवालनिर्माते संजय गुप्ता यांनी रणवीरसारख्या अभिनेत्यावर बंदी घालण्यामागील निर्णयावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘जेव्हा एखादा ए-लिस्ट हिरो शूटिंग करतो, तेव्हा सेटवर 300 हून अधिक कामगार काम करत असतात. त्याच्यावर बंदी घालून तुम्ही त्याला थांबवत नाही आहात, तर उलट त्या कामगारांना त्यांच्या उपजीविकेपासून वंचित करत आहात. याचा अर्थ तरी काय आहे?’
फेडरेशनची बाजूएप्रिल महिन्यात फरहानने ‘डॉन 3’ या चित्रपटाच्या वादाबद्दल फेडरेशनकडे तक्रार केली. त्यानंतर रणवीरविरुद्ध असहकाराचा आदेश जारी केला आहे. या संस्थेकडून रणवीरला अनेकदा नोटीस बजावूनही त्याच्याकडून कोणतंच उत्तर न मिळाल्याने अखेर हा आदेश जारी करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय. या कारवाईमागील कारण स्पष्ट करण्यासाठी फेडरेशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, शूटिंग सुरू होण्याच्या तीन आठवडे आधी रणवीर या चित्रपटातून बाहेर पडला आणि त्याने नोटिसांकडेही दुर्लक्ष केलं, अशी तक्रार फरहानने दाखल केली. आमच्याकडे तक्रार पोहोचताच आम्ही औपचारिकपणे नोंद घेत रणवीरला त्याची बाजू मांडण्यासाठी दर दिवसांनी एक याप्रमाणे तीन नोटिसा पाठवल्या. पण आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आम्ही हा निर्णय घेतला आहे.