CM Thalapathy Vijay Meet PM Modi: तामिळनाडूचे (Tamil Nadu) नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय (Chief Minister Joseph Vijay) यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. दोघांची भेट दिल्लीत झाली. या भेटीवेळी थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी पंतप्रधान मोदींसमोर (PM Modi) तामिळनाडूसाठी काही महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा केली, या मागण्या बऱ्याच काळापासून केंद्र सरकारकडून रखडलेल्या आहेत. मुख्यमंत्री थलपती विजय तामिळनाडूच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे मु्द्दे आणि मागण्या घेऊन पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचले. अद्याप थेट पंतप्रधान मोदींच्या भेट घेण्यामागचा त्यांचा पूर्ण अजेंडा समोर आला नाही. पण, असं म्हटलं जातं की, त्यांनी पंतप्रधानांव्यतिरिक्त इतरही अनेक महत्त्वाच्या राजकारण्यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री विजय यांची अत्यंत आपुलकीनं भेट (CM Thalapathy Vijay Meet PM Modi)
या दोन दिग्गजांच्या भेटीचे जे फोटो समोर आले आहेत, त्यावरून सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. 'थलपती' विजय हे पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यावेळी त्यांनी एक साधा काळ्या रंगाचा ब्लेझर, पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केलेली. त्यांनी पंतप्रधानांना फुलांचा सुंदर गुच्छ दिला. पंतप्रधान मोदींनीही, नेहमीच्या आपल्या स्वभावाप्रमाणेच, विजय यांचे हसतमुख चेहऱ्यानं स्वागत केलं. प्रसिद्ध झालेले हे फोटो स्पष्टपणे दर्शवतात की, या दोघांमधील ही भेट अत्यंत आपुलकीपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि थलपती विजय यांची जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांमधील ही भेट साधारणपणे 25 मिनिटं चालली, अशी माहिती मिळतेय. ही भेट सध्या चर्चेचा विषय बनली आहे, कारण थलपती विजय हे सध्या काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार चालवत आहेत. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये या संदर्भात आणखी एका गोष्टीचीही चर्चा सुरू आहे, ती म्हणजे, राज्यात भाजपची सहयोगी असलेल्या 'एआयएडीएमके' (AIADMK) पक्षाचे काही आमदार फुटून 'टीव्हीके' (TVK) पक्षात सामील होण्याची शक्यता.
Chief Minister of Tamil Nadu, Thiru @actorvijay met Prime Minister @narendramodi today.@CMOTamilnadu pic.twitter.com/xwE8THhDEV
— PMO India (@PMOIndia) May 27, 2026
तामिळनाडू हाऊसमध्ये पोहोचले विजय
दिल्लीत दाखल होताच, थलपती विजय सर्वात आधी मध्य दिल्लीतील 'तामिळनाडू हाऊस'कडे रवाना झाले. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांची भेट दुपारी 4:30 वाजता नियोजित होती. संध्याकाळी, पंतप्रधानांना भेटण्यासाठी विजय 'सेवा तीर्थ' इथे पोहोचले. या दोघांमधील ही भेट साधारणपणे 25 मिनिटं चालली. या भेटीदरम्यान विजय आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या संभाषणाबाबतचे तपशील अद्याप प्रतीक्षेत आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्याशी कोणत्या विषयांवर चर्चा झाली?
विजय यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी तामिळनाडूशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तामिळनाडूतील शासकीय कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम' ऐवजी राज्याचे गीत असलेल्या 'तामिळ थाई'चे गायन सर्वात आधी करण्याची परवानगी त्यांनी मागितली. विजय यांनी नमूद केलं की, 'अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट' (AMCA) आणि 'सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टिम्स' (CABS) या प्रकल्पांबाबत सध्या DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) इथे अभ्यास सुरू आहे. त्यांनी पंतप्रधानांना विनंती केली की, CABS ची ही सुविधा तामिळनाडूमध्येच स्थापन करण्यात यावी. विजय यांनी 'मेकेदातू'चा मुद्दाही उपस्थित केला, जो कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात सुरू असलेला एक वाद आहे. याव्यतिरिक्त, श्रीलंकेच्या नौदलाकडून तामिळनाडूतील मच्छिमारांवर होणारे हल्ले आणि त्यानंतर त्यांना केली जाणारी अटक यांबद्दल विजय यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी याकडे लक्ष वेधलं की, त्यांच्या राज्यातील 58 मच्छिमार सध्या श्रीलंकेच्या तुरुंगांमध्ये अटकेत आहेत आणि 288 मासेमारी बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. श्रीलंकेत अटकेत असलेल्या या मच्छिमारांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी विजय यांनी केली आहे.
ABP माझाच्या बातम्या LIVE...