नवतपात असह्य झळा! नागपुरात उष्णतेचा कहर, 4 दिवसांत 18 जणांचा उष्माघातामुळे बळी?
तुषार कोहळे May 31, 2026 11:13 AM

Nagpur Heatwave : विदर्भात काही जिल्ह्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळात आहे. तर काही ठिकाणी पावसानं एकच दाणादाण उडवली आहे. अशातच या हवामानाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्याला बसतो आहे. अशातच नागपूर (Nagpur News) शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये उष्माघाताने (Heat Stroke) आणखी तीन संशयित मृत्यू (Heat Wave Death) झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागपूर शहरात गेल्या चार दिवसांतील उष्माघाताच्या संशयित मृत्यूंचा आकडा 18 वर पोहोचला आहे.

Nagpur Heat Wave Death : नागपूरमध्ये उष्माघाताने आणखी तीन संशयि मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (31 मे) दुपारच्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयदीप सोसायटीजवळ रस्त्याच्या कडेने एक बेवारस अवस्थेत एक व्यक्ती सापडला. त्याला रुग्णालयात नेते असता त्याचा वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान, दुसरी घटना सेंट्रल एव्हेन्यू परिसरात घडली. एक इसम बेशुद्ध अवस्थेत सापडला. यावेळी त्याला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर तिसरा घटना जरीपटका बस स्थानक परिसरातून पुढे आली. तेथे देखील एक इसम मृतावस्थेत आढळला. तिन्ही मृतदेहाची ओळख पटली नसली तरी प्राथमिक चौकशीत हे मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय आहे.

Yavatmal Heat Wave Death : 24 तासात सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय

यवतमाळ जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असताना गेल्या 24 तासात सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे. यात एका पाच वर्षीय बालकाचा देखील समावेश आहे. नेर तालुक्यातील वटपळी येथील संविधान वासनिक या पाच वर्षे बालकाला तीन दिवसांपासून ताप आणि जुलाबचा त्रास होता, ज्यात त्याचा मृत्यू झाला. तर फुलसावंगी येथे सचिन पाचखंडे या इसमाचा मृतदेह आढळून आला. यासोबतच आर्णी, जवळा, घाटंजी तालुक्यातील साखरा आणि पांढरकवडा येथे देखील प्रत्येकी एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला. जिल्ह्यात आतापर्यंत 14 जनांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची संशय व्यक्त केला जात असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यू नेमका कशाने झाले हे स्पस्ट होणार आहे.

Bhandara Rain : भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

भंडाऱ्यात सायंकाळी वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याच तापमान 45 अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याने प्रचंड उकडा निर्माण झाला होता. या उकळ्यामुळे नागरिकांसह पाळीव जनावर आणि पशुपक्षीही हैराण झाले होते. भंडारा शहरासह ग्रामीण भागातही आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या या मान्सूनपूर्व पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.