'चला हवा येऊ द्या'मधील अभिनेत्यावर 20-30 जणांनी केला हल्ला, नेमकं काय घडलं?
Tv9 Marathi May 31, 2026 12:45 PM

मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अंकुर वाढवे याच्यावर २० ते ३० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतः अंकुरने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली असून काल, २९ मे रोजी पुसद येथे हा भ्याड हल्ला झाल्याचे त्याने सांगितले आहे. त्याची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, या घटनेची माहिती मिळताच चिंतेत पडलेले चाहते त्याच्या प्रकृतीची आणि सुरक्षिततेची विचारपूस करत आहेत.

काय आहे अंकुरची पोस्ट?

अंकुर विठ्ठलराव वाढवेने त्याच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. “काल पुसदमध्ये माझ्यावर २० ते ३० लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने प्रकरण टळलं. पण यावरून लक्षात येते की, पुसदमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे” असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, अंकुरवर हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

अभिनेत्याने केले फेसबुक लाईव्ह

अंकुरने हल्ला झाल्याचे सांगितल्यानंतर फेसबुकवर लाईव्ह येत नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे. “नमस्कार, मला काहीही झालेले नाही. पुसदमध्ये एका सिनेमाचे शुटिंग सुरू होते. त्या सिनेमामध्ये काम करत असणारे माझे मित्र मला भेटायला आले होते. त्यात काही असे जण होते, ज्यांनी मद्यपान केले होते. ते आमच्या शेजारच्या घरावर लघवी करत होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून, आम्ही सर्वांनीच त्यांना रिटर्न पाठवले. मी माझ्या मित्राला म्हटले की, तू पण जा, नंतर केव्हा तरी भेटूयात. तिथे एक मुलगा होता, त्याचीच चूक होती. तो एकटा ३० ते ४० जण मारहाण करण्यासाठी घेऊन आला होता. यावेळी त्यातील काही लोकांनी मला ओळखले. त्यातील काही माझे आणि माझ्या भावाचे वैगेरेही मित्र होते” असे अंकुर म्हणाला.

पुढे तो म्हणाला, “परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून आम्ही ते प्रकरण तेव्हाच सोडून दिले होते. सकाळी मला जाणवले की पुसदमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. मी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून तक्रार दाखल करायची आहे, असे सांगितले. पोलिसांनी संबंधित तरुणाला बोलावले. मी त्याच्या विरोधात एफआयआर नोंद केली नाही, कारण त्याचे उगाच करियर बरबाद होण्यापेक्षा मी त्याला माफ केले. पण मी त्याला एवढंच सांगितलं की, ज्या घरावर जो लघवी करत होता, त्या घरातील वहिनींची माफी माग. खरंतर, या संपूर्ण घटनेतून मला एकच गोष्ट जाणवली की, पुसदमध्ये वाढत्या गुन्हेगारीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.” सध्या सोशल मीडियावर अंकुरची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.