>> विशाल फुटाणे, [email protected]
दक्षिण भारतातील भगवान शिवाचे निस्सीम भक्त असलेले प्राचीन चोल राजे व त्यांचे साम्राज्य केवळ युद्धवैभव, मंदिरे आणि स्थापत्यकलेसाठीच प्रसिद्ध नव्हते, तर न्यायप्रिय राज्यव्यवस्थेसाठीही ओळखले जात होते. त्या परंपरेमध्ये आजही लोकस्मृतीत जिवंत असलेले एक नाव म्हणजे मनुनेठी चोल तामीळ भाषेत ‘मनुनीती’ म्हणजे मनूच्या न्यायशास्त्रानुसार राज्य करणारा राजा. त्यामुळे हा राजा केवळ ऐतिहासिक व्यक्ती नव्हे, तर न्याय आणि राजधर्माचे प्रतीक म्हणून पाहिला जातो.तिरुवारूरच्या त्यागराजा मंदिर परिसरातील दगडी रथाचे हस्तकला भारतीय न्यायसंस्कृतीचा शांत इतिहास सांगते.
तामीळनाडूतील त्यागराज मंदिर परिसरात आजही या कथेशी संबंधित दगडी रथ दाखवला जातो. त्या शिल्पाकडे पाहताना असे वाटते की, हजारो वर्षांपूर्वीचा न्यायाचा आवाज अजूनही त्या दगडांमध्ये घुमत आहे. तिरुवारूर ही नगरी प्राचीन काळापासून शैव भक्तिपरंपरेचे महत्त्वाचे केंद्र राहिली आहे. त्यागराजस्वामी मंदिर हे चोल स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. विशाल प्राकार, भव्य गोपुरे, शिल्पवैभव आणि मंदिरसंस्कृतीमुळे हे स्थान दक्षिण भारतीय सांस्कृतिक इतिहासात विशेष महत्त्व प्राप्त करते. लोकपरंपरेनुसार राजवाडय़ाबाहेर एक मोठी घंटा लावलेली होती. राज्यातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर ती घंटा वाजवून थेट राजाकडे न्याय मागता येत असे. विशेष म्हणजे ही व्यवस्था केवळ मानवांसाठी नव्हे, तर प्राणीमात्रांसाठीही खुली होती, अशी लोकश्रद्धा आहे. ही कल्पना त्या काळातील राजधर्माची व्यापकता आणि करुणेची जाणीव करून देते.
एक दिवस राजपुत्र रथातून नगरातून जात असताना चुकून एका लहान वासराला रथाखाली चिरडले गेले. त्या निष्पाप वासराचा जागीच मृत्यू झाला. वासराची आई दुःखाने व्याकूळ झाली. लोककथेनुसार ती थेट राजवाड्याबाहेर गेली आणि आपल्या शिंगाने न्यायाची घंटा वाजवली. घंटानाद ऐकून राजा दरबारात आला. चौकशी केल्यानंतर त्याला समजले की, अपराध करणारा दुसरा कोणी नसून स्वतःचा पुत्र आहे. एका बाजूला पितृत्वाची भावना आणि दुसऱ्या बाजूला राजधर्म असा कठीण प्रसंग त्याच्यासमोर उभा राहिला. परंतु मनुनीती चोलाने स्वतच्या भावनांपेक्षा न्यायाला श्रेष्ठ मानले. ज्या प्रकारे वासराचा मृत्यू रथाखाली झाला होता, त्याच प्रकारे राजपुत्रालाही शिक्षा देण्यात आली, असे या लोककथेत सांगितले जाते. ही घटना ऐतिहासिकदृष्ट्या तंतोतंत घडली का याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, परंतु दक्षिण भारतातील लोकस्मृतीमध्ये ही कथा न्यायाच्या सर्वोच्च आदर्शाप्रमाणे जपली गेली आहे.
त्यागराज मंदिर परिसरात असलेले दगडी रथशिल्प या कथेला दृश्यमान रूप देते. रथाजवळ कोरलेली गाय आणि वासराची प्रतिमा अत्यंत हृदयस्पर्शी आहे. दक्षिण भारतीय मंदिरकलेमध्ये केवळ धार्मिक प्रसंग नव्हे, तर सामाजिक आणि नैतिक संदेशही शिल्पांमधून व्यक्त केले जात. हा दगडी रथ त्याच परंपरेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. या शिल्पामध्ये न्याय, करुणा आणि राजकीय उत्तरदायित्व यांचा संगम दिसून येतो. त्यामुळे हे केवळ धार्मिक प्रतीक नसून प्राचीन भारतीय न्यायतत्त्वज्ञानाचे स्मारक आहे. भारतीय राजकीय तत्त्वज्ञानात राजा हा सर्वश्रेष्ठ असला तरी तो धर्माच्या अधीन मानला गेला आहे. दक्षिण भारतीय शैव राजसत्तांमध्ये ही संकल्पना विशेष प्रभावी होती. मनुनीती चोलाची कथा ही या तत्त्वज्ञानाचे सर्वात प्रभावी लोकाभिमुख रूप आहे. मनुनीती चोलाचा उल्लेख अनेक तामीळ साहित्यपरंपरांमध्ये आढळतो. प्रसिद्ध शैव ग्रंथ पेरियापुराणमध्ये न्यायप्रिय चोल राजांची गौरवपूर्ण परंपरा दिसते. तसेच सिलप्पडिकाराम आणि मनीमेकलाई या ग्रंथांमध्ये दक्षिण भारतीय समाजातील न्याय, नैतिकता आणि राजकीय मूल्यांचे प्रतिबिंब दिसून येते.
दक्षिण भारतीय राजसत्तांमध्ये विशेषत चोल, पल्लव, चालुक्य, राष्ट्रकूट आणि होयसळ काळात ही संकल्पना व्यवहारात दिसून येते. अनेक शिलालेखांतून राजांनी स्वतला ‘धर्मसंस्थापक’, ‘धर्मरक्षक’ किंवा ‘लोककल्याणकारी’ म्हणून संबोधले आहे. मंदिरांना दिलेली दाने, जलव्यवस्था, तळी, विहिरी, अन्नछत्रे, शिक्षणकेंद्रे आणि धर्मशाळा यांमागे केवळ धार्मिक हेतू नव्हता, तर सामाजिक कल्याणाची भावना होती. आजही तामीळ समाजात मनुनीती चोलाचे नाव घेतले की, न्यायप्रियतेची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. या कथेमध्ये केवळ एका राजाचा निर्णय नाही, तर संपूर्ण भारतीय सांस्कृतिक मनोभूमिकेतील ‘धर्म सर्वोच्च’ ही भावना प्रतिबिंबित होते.
तिरुवारूरच्या दगडी रथाजवळ उभे राहिल्यावर जाणवते की, हा केवळ दगड नाही, तो भारतीय न्यायसंस्कृतीचा एक मौन इतिहास आहे.