
भूतानला सध्या पर्यटकांची गर्दी आहे. 95 टक्के पर्यटक भारतीय. 50 टक्के महाराष्ट्राचे लोक इथे दिसले. हिरवेगार जंगल, खळखळणाऱ्या स्वच्छ नद्या, प्रामाणिक राजा, प्रामाणिक प्रजा, सहाशेपेक्षा जास्त औषधी वनस्पती येथील उंच डोंगरावर आहेत. कॅन्सरपासून इतर सर्व आजारांवर त्या उपयुक्त असल्याचे येथील संशोधनात सिद्ध झाले. आनंदी आणि पुण्यवान लोकांचा हा देश.
भारताच्या सीमेवरील भूतान हा स्वतंत्र देश आहे, पण भूतानमध्ये पाऊल ठेवल्यापासून परत निघेपर्यंत आपण परदेशात आहोत असे कुठेच वाटत नाही. (वैद्यकीय कारणांसाठी) सात दिवस भूतानची सैर करता आली. ती आनंददायक वाटली. माणुसकी हरवलेल्या देशातून माणुसकी जपणाऱ्या देशात आल्याची भावना प्रबळ झाली. एक लक्षात आले ते म्हणजे, भूतानमध्ये भारताप्रमाणे ‘जीडीपी’चा खेळ नाही. तेथे ‘जीएनएच’ला महत्त्व आहे. (Gross National Happiness) महत्त्व आहे. लोकांनी आनंदी व समाधानी राहावे यासाठी तेथील शासन व भूतानचे राजे काम करतात. 1970 च्या दशकात भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांनी जीएनएच (GNH) ची संकल्पना मांडली. वांगचुक यांनी सांगितले, “सुख, पैसा, संपत्ती, उत्पादनात तोलता येत नाही. Gross National Happiness is more important than Gross domestic product.” इतके बोलून ते थांबले नाहीत, तर 2008 साली भूतानचे जे संविधान निर्माण झाले त्या संविधानात या संकल्पनेला अधिक स्थान देण्यात आले. भारतात जातीय आरक्षणापासून ते निवडणुका कशा घ्याव्यात यावर मार्गदर्शन भरपूर, पण लोकांना आनंदी, समाधानी ठेवण्याबाबत मात्र काहीच नाही. भूतानी लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळत नाही. एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. तेथे सगळे कर्मचारी भूतानी होते. दरवाजावर Closed चा बोर्ड लटकत होता. ‘कालच आपण इथे या वेळेस जेवण केले. भारतीय पर्यटकांनी हॉटेल गच्च भरले होते. आज बंद का?’ असा प्रश्न मनात आला. पुरेसा स्टाफ उपलब्ध नसल्याने आज सेवा पुरवता येत नसल्याचे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. खाली उतरलो. गाडीत बसलो तेव्हा गाईडने सांगितले, “स्टाफ ही समस्या नाही.”
“मग?”
“सर, जागतिक युद्धस्थितीमुळे सिलिंडर टंचाईचा हा फटका आहे, पण ‘टंचाई’ आहे असे सांगितल्याने देशात ‘पॅनिक’ अवस्था होऊ नये,” गाईड.
भारतात ‘टंचाई’च्या मुद्द्यावर सरकार-विरोधकांत रणकंदन माजले आहे. लोकांच्या रांगा लागल्या आहेत. जनतेच्या चेहऱ्यावरचा तणाव पुढील विद्रोहाची चिंता दाखवतो. भूतानमध्ये ‘टंचाई’ आहे, पण लोकांनी त्यावर बोलणे टाळले आहे हे महत्त्वाचे.
भारताची जबाबदारी
भूतान भारताचा मित्र आहे. भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारताने स्वीकारली ती आजही कायम आहे. भूतानची जनता त्यासाठी पंडित नेहरूंचा आजही सन्मान करते. नेहरूंच्या नावाने भारत-भूतान फ्रेण्डशिपच्या अनेक संस्था ‘थिम्पू’ आणि ‘पारो’त उभ्या आहेत. तिबेट आणि भूतानचा बुद्ध धर्म एकच. वज्रयान बौद्ध धर्म हा भूतान व तिबेटचा मुख्य धर्म. तिबेटमधून हा धर्म भूतानच्या भूमीवर आला, पण भूतान व तिबेटच्या सीमा आज बंद आहेत. कारण तिबेटवर चीनचे नियंत्रण आहे. चीन व भूतानमध्ये कोणतेही राजनैतिक संबंध सध्या नाहीत. संरक्षणासाठी भूतान पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. भूतानमध्ये पोलीस स्टेशन आहेत, पण फारसे गुन्हे घडत नसल्याने पोलिसांना काम नाही. मी स्वतः ‘पारो’च्या जिल्हा न्यायालयात गेलो. कोर्टात आपल्याप्रमाणे ‘सत्यमेव जयते’चा खोटा बोर्ड रंगवलेला नाही. तेथील कोर्टही मंदिराच्या रचनेप्रमाणेच आहेत व कोर्टावर लिहिले आहे, Equal Justice Court (समान न्यायाचे न्यायालय). कोर्टालाही फारसे काम दिसले नाही. कारण इथली लोक धार्मिक, आध्यात्मिक व प्रामाणिक. हे सर्व गुण त्यांच्या धर्म शिकवणीत आहेत. पुण्यातील पर्यटकांचा एक घोळका थिम्पूला भेटला. लोकांच्या प्रामाणिकपणावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हे लोक इतके प्रामाणिक कसे? मी सांगितले, “इथला राजा प्रामाणिक आहे. त्यामुळे प्रजाही प्रामाणिक झाली. जनतेला तिच्या लायकीप्रमाणे राजा मिळतो हे चाणक्य सूत्र भूतानात खरे ठरले.” भूतानी लोकांच्या प्रामाणिकपणाचा लौकिक जगभरच आहे. शांतता, सौजन्य, नैतिकता हे त्यांच्या जगण्याचे सूत्र आहे. वज्रयान बौद्ध धर्माचा प्रभाव येथील बहुसंख्य लोकांवर आहे. या धर्मात सत्य, करुणा, नैतिकता आणि अहिंसा यांना खूप महत्त्व आहे. प्रामाणिकपणा हा केवळ व्यक्तिगत नाही, तर भूतानच्या दैनंदिन जीवनाचे ते सूत्र आणि आध्यात्मिक प्रगतीचा भाग आहे. हिंदू धर्मातही हे सगळे आहे. पण राजाने प्रामाणिकपणा सोडला. तरीही प्रजा त्याच राजाला पुजत आहे. हिंदूंच्या सध्याच्या ठेकेदारांनी भूतानमध्ये येऊन धर्मराज्य आणि धर्मध्वजा म्हणजे काय ते अभ्यासायला हवे. आपल्याकडून कोणतेही पाप घडू नये, गुन्हा घडू नये यासाठी भूतानी लोक सतत हाती माळा घेऊन मंत्रजप करताना दिसतात. बाजारात, रस्त्यावर चालताना सर्वत्र त्यांचे हे मंत्रपठण सुरू असते. हे सर्व त्यांना आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा देत असते. हे लोक आपल्या प्रतिष्ठेला जपतात, शांत राहतात. एकमेकांना मदत करतात. mind your own business च्या तत्त्वावर चालतात. एका पर्यटकाने सांगितले, “मी प्रत्येक वर्षी भूतानला येतो.” त्याने पुढे सांगितले, “इथे मन शांत राहते. विश्वास, प्रामाणिकपणाचे मूल्य कळते. भारतात आता कोणत्या स्तरावर भ्रष्टाचाराचा निर्देशांक पोहोचला आहे ते येथील ‘गुड गव्हर्नन्स’चा अनुभव घेतल्यावर पटते.” इथे भ्रष्टाचार जवळ जवळ नाहीच. जगाच्या पाठीवर हा एक चिमुकला देश आहे. तेथे भ्रष्टाचार नाही असे आपले भारतातील लोक सांगतात तेव्हा भूतानचे कौतुक वाटते.
औषधी वनस्पतींचे जंगल
‘मेनजाँग ग्यालरवब’ ही भूतानची जुनी ओळख. ती आजही आहे. मेनजाँग ग्यालरवब म्हणजे औषधी वनस्पतींचा देश. येथे औषधांचे (Pharmaceutical) उद्योग नाहीत, तर 600 पेक्षा जास्त वनऔषधींचे भांडार येथील डोंगरांवर आणि जंगलांत आहेत. यार्सा गुनबुशी (Caterpillar Fungus) सारख्या दुर्मिळ औषधी वनस्पती 6000 मीटर उंचीवर आढळतात. जगातली महागडी वनऔषधी म्हणून तिला मान्यता आहे. ही वनस्पती कॅन्सरपासून अस्थम्यापर्यंत सर्व आजारांना नियंत्रणात आणते असा विश्वास अनेकांना आहे. भारतातील अनेक नेते, अभिनेते, अभिनेत्री या वनस्पतीच्या उपचारासाठी वर्षातून किमान दोन वेळा तरी भूतानला येतात. ‘थिम्पू’त Institute of Traditional Medicine Services उभी आहे. येथे भूतानमधील सर्व पारंपरिक औषधे व उपचार पद्धती उपलब्ध आहे. भारत आणि युरोपियन राष्ट्रातील अनेक जण येथे येतात.
प्रशिक्षित डॉक्टर उपचार करतात व वनस्पतींवर संशोधन करून नव्या औषधांची निर्मिती करतात. शेकडो वनस्पती व त्यांच्या सुगंधाने ही इन्स्टिट्यूट माणसाला प्रसन्न करते. भूतान ही औषधी वनस्पतींची जमीन आहे. (Land of Medicinal Herbs) आहे व या सगळ्याला एक धार्मिक अधिष्ठान नक्कीच आहे. येथे अजून कोणी व्यावसायिक रामदेवबाबा निर्माण झाला नाही. त्यामुळे औषधी वनस्पतींचे पावित्र्य टिकून आहे.
स्वच्छ खळखळणाऱ्या नद्या
भूतान हा आनंदाचा देश आहे. नैसर्गिक सौंदर्याचा हा खजिना आहे. 60 टक्के हिरवळ आहे. स्वच्छ नद्या खळखळून वाहताना दिसतात. नद्या इतक्या स्वच्छ आणि पारदर्शक की, अनेक ठिकाणी नदीचा तळ दिसतो. भारतात नद्यांची पूजा होते. कुंभ पर्व होते. नद्यांना माता म्हटले जाते, पण नद्या कमालीच्या प्रदूषित. भूतानमधील नद्यांची पूजा होत नाही. नद्यांचे उत्सव, धर्मविधी नाहीत, पण जणू हिमालयातून पवित्र गंगा खळखळत भूतानला आली असे तिच्याकडे पाहून वाटते. या नद्यांइतकेच भूतानचे शासन व राजकारण स्वच्छ आहे. भूतानच्या पंतप्रधानांचे व मंत्र्यांचे फोटो, बॅनर्स, होर्डिंग्ज मला कोठेच दिसले नाहीत, पण सध्याचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची सपत्नीक छायाचित्रे सर्वत्र दिसतात. राजाविषयी जनतेला आदर आणि प्रेम आहे. 2008 साली भूतानमध्ये राजेशाहीऐवजी Constitutional Monarchy म्हणजे संवैधानिक राजेशाही आली. राजाने भूतानला संसदीय लोकशाही बहाल केली, पण राजा हा पूर्णपणे संवैधानिक प्रमुख म्हणजे Head of state आहे. भूतानचा मुख्य धर्म ‘बौद्ध’, पण हे ‘बौद्ध गणराज्य’ राजाने बनू दिले नाही हे महत्त्वाचे. बौद्ध मठ व त्यांच्या प्रमुखांचा राज्य शासनात हस्तक्षेप नाही. त्यांनी धर्म, अध्यात्म व इतर धार्मिक कार्य करत राहावे. धर्म आणि शासन व्यवस्थेत येथे गल्लत होऊ देत नाहीत. त्यामुळे शासन व धर्म आपापल्या मार्गाने पुढे जातात. अनेक मठांत परंपरेने ‘तांत्रिक’ पूजा होतात. यात जादूटोणा वगैरे शक्तीचा समावेश आहे. हे सर्व प्रकार तिबेटमधून भूतानला आले, पण भूतानी जनता या जादूटोण्याच्या वाटेला आता जात नाही. मग येथे हे जादूटोणा उपचार करून घेणारे कोण? “तुमच्या महाराष्ट्रातले अनेक राजकारणी चार्टर विमानाने येथे खास यासाठी येतात. तो एक वेगळा विषय आहे,” अशी माहिती एका मठाधिशाने दिली.
तरीही भूतान सुंदर, स्वच्छ, प्रामाणिक, आनंदी देश आहे. शेकडो औषधी वनस्पतींचा हा देश मनाने भारताच्या जवळ आहे!
सीमा या नावाच्याच आहेत.
भारत आणि भूतान फक्त ‘शेजारी’ नाहीत. हिमालयाशी जोडलेले हे दोन आत्मे एकमेकांवर विश्वास ठेवून वाटचाल करत आहेत. भूतान हा पुण्य कमवून जगणाऱ्यांचा देश आहे. भारतात सध्या त्याचीही टंचाईच आहे.
पण भूतान हे आपल्या गंगेप्रमाणे पाप धुण्याचे ठिकाण नाही. येथील नद्यांत पुण्य वाहते. येथील जंगलात, झाडा-झुडपात पुण्य आणि सचोटीचा वास आहे.
प्रत्येक भारतीयाने ‘पुण्य’ म्हणजे काय हा अनुभव एकदा तरी घ्यावा. भूतान एक देश नाही, स्वच्छ मनाचा अनुभव आहे.
ट्विटर – @rautsanjay61
Gmail- [email protected]