मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपुरमध्ये कराचा भीषण अपघात; दोन महिलांचा दुर्दैवी अंत; मनसेकडून आक्रमक पवित्रा, हॉटेलमध्ये तोडफोड, बॅनर फाडले
गणेश म्हाप्रळकर May 31, 2026 01:13 PM

Raigad Car Accident News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघातांची मालिका बघायला मिळत असून अद्यापही अपघात सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा मुंबई-गोवा महामार्गवर (Mumbai-Goa Highway) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघे जागीच ठार (Raigad Car Accident) झाले असून इतर दोघे जण जखमी असल्याची माहिती आहे. रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून धडक (Accident) दिल्याने हा अपघात झाला असून अपघातात कारचा अक्षरशःचेंदामेंदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Raigad Car Accident : अपघातानंतर रायगडमधील मनसे आक्रमक, हॉटेलचे बॅनर फाडले, खुर्ची फेकल्या

दरम्यान, या अपघातानंतर रायगडमधील मनसे आक्रमक झाली असून ज्या हॉटेल समोर अपघात झाला त्या राजस्थानी हॉटेलचे बॅनर फाडत, खुर्ची फेकत मनसेने आपला संताप व्यक्त केला. रस्त्यावर हॉटेल समोर उभ्या कंटेनरवर कार आदळून हा अपघात झाला होता. या अपघातात दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे धोकादायक ठिकाणी, होटेल समोर महामार्गावर ट्रक, कंटेनर, टँकर उभे करण्यावर मनसेने संताप व्यक्त करत आपला आक्षेप नोंदवला आहे.

रस्त्याच्या कडेला उभ्या कंटेनरला कारची जोरदार धडक, दोन महिलांचीच जागीच अंत

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी मुंबई- गोवा महामार्गावर पोलादपुर हद्दीत झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मुबंई-गोवा महामार्गवर पोलादपूर तालुक्यात लोहारमाळ गावाच्या हद्दीतील ही घटना आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दापोली कृषी विद्यापीठ येथे कार्यरत असलेले कर्मचारी अनिल मारकड हे कुटुंबासह नगर येथून दापोलीला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.