सोलापूर: मंगळवेढा येथील रिलस्टार रोहिणी पाराध्ये (Rohini Paradhye) हिने तिच्या हॉटेलमध्येच टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या अवघ्या २५ वर्षीय रोहिणीने (Rohini Paradhye) पती निलेशसोबत (Nilesh Paradhye) तिने अवघे ५ वर्ष सुखाने संसार केला. पण, तिने सगळं सुरळीत सुरू असताना तिने टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रोहिणीच्या (Rohini Paradhye) निलेशने तिच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर करत दोघांचे फोटो देखील सोशल मिडीयावर टाकले आहेत. "माझी बायको माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं गं..." असं म्हणत पहिल्यांदाच निलेशने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.(Rohini Paradhye)
पोस्टमध्ये निलेशने (Nilesh Paradhye) म्हटलंय की, "माझी बायको माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं ग...या पाच वर्षांच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणतीच नाही.जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं.
आज चांगले दिवस यायला लागले होते... आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता... पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस. आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम... सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं. चिमणे... परत ये गं... तुला खूप काही सांगायचं बाकी आहे... तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय.
तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील.
मिस यू ग माझ्या चिमणे...".
रोहिणी आणि तिचे पती निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता. आंतरजातीय विवाह करून हे दोघेही पुणे येथे काही काळ वास्तव्य करत होते. पुणे इथे असतानाच हे दोघेही रील करू लागले. यानंतर आपल्या मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी 'हॉटेल ग्रामपंचायत' नावानं हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधील रोजच्या खेळीमेळीच्या वातावरणातील रील बनवून रोहिणी आणि निलेश दोघेही प्रसिद्ध झाले आणि त्यांचं हॉटेलही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलं.
याच काळात त्यांनी मंगळवेढा तालुक्यातच दोन ठिकाणी नव्यानं हॉटेलच्या शाखा सुरू केल्या. मात्र, या दोन्ही शाखांचं व्यवस्थापन करणं, जिकरीचं होत असतानाच. आर्थिक घडी नीट बसवणं आणि शाखा चांगल्या चालवणं, अशा गोष्टींची तारेवरची कसरत होत होती. यातूनच दोघांत वाद आणि तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. रोहिणीनं हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे, रोहिणीचा निलेश सोबतच दुसरा विवाह असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नीलेशसोबत प्रेमविवाह झाल्यावर नक्की कुठल्या कारणानं तिनं हे टोकाचं पाऊल उचललं? नक्की दोघांमधील मतभेद होता की, अन्य कुठलं वेगळं कारण होतं का? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. मात्र याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस आता आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.