>> जे. डी. पराडकर, jdparadkar@gmail.com
सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा लाभलेल्या कोकणचं ऐतिहासिक दृष्टीने असलेलं महत्त्व खूप मोठं आहे. प्राचिन मंदिरातील शिल्पकला, अप्रतिम कोरीवकाम केलेल्या मूर्ती, गडकिल्ले सारं काही अचंबित करणारं आहे. मंदीर परिसरात असणारे विरगळ, गद्धेगळ आणि सतीशीळा हे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्याने दृष्टीआड होण्याच्या स्थितीत असल्याचे पाहायला मिळते. दुर्गवीर प्रतिष्ठानसोबत काम करणाऱ्या अजित राणे या तरुणाला गावात इतस्ततः विखुरलेल्या सतीशीळा एकत्र करण्याचा ध्यास लागला होता. ग्रामस्थांचे मन वळवून त्यांनी अनेकांच्या मदतीने कोकणच्या रत्नागिरी जिल्हामधील संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावात 55 सतीशीळा एकत्र आणल्या. कोकणातील हे पहिले सतीशळा स्मारक, ज्याचे नुकतेच उद्घाटन झाले.
संगमेश्वर तालुक्यातील भवानगड किल्ला यांच्या पायथ्याशी असलेल्या या गावात अनेक प्राचीन सतीशिळा वर्षानुवर्षे विखुरलेल्या अवस्थेत पडून होत्या. या दगडी स्मृतीशिळा गावाच्या इतिहासाचा मौन वारसा जपून होत्या; मात्र अनेक वर्षे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. काही शिळा गावकऱ्यांच्या श्रद्धास्थान बनल्या होत्या आणि दैवत म्हणून पूजल्या जात होत्या, त्यामुळे त्यांच्या ऐतिहासिक मूल्याकडे अपेक्षित लक्ष गेले नव्हते. गावातील प्राचीन मंदिरांच्या परिसरात अशा सतीशिळा, गद्धेगळ, विरगळ पाहायला मिळतात. त्यापैकी सतीशिळा या तत्कालीन समाजजीवन, स्त्रियांचे स्थान आणि सामाजिक परंपरांचे प्रतीक मानल्या जातात. पतीच्या निधनानंतर सती गेलेल्या स्त्राrच्या स्मरणार्थ उभारलेल्या या दगडी शिळांवर स्त्रीची प्रतिमा, हाताची आकृती, सूर्य-चंद्राची चिन्हे किंवा तत्कालीन लिपीतील लेखन कोरलेले असते. त्यामुळे त्या केवळ धार्मिक प्रतीक नसून इतिहासाचे मौन साक्षीदार ठरतात.
या मौल्यवान वारशाचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने इतिहासप्रेमी दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य अजित राणे यांनी स्वतच्या कडवई गावातील विखुरलेल्या सतीशिळांचे एकत्रित स्मारक उभारण्याचा संकल्प केला. या शिळांना सुरक्षित स्थळी आणून त्यांचे शास्त्राrय पद्धतीने जतन करावे आणि पुढील पिढय़ांसाठी हा इतिहास जिवंत ठेवावा, अशी त्यांची भूमिका होती. प्रारंभी ग्रामस्थांची अनास्था, तसेच शिळांचे दैवतीकरण झाल्यामुळे या कार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. ग्रामस्थांना या शिळांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व पटवून दिले.
महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या परवानगीनंतर स्मारक उभारणीसाठी आवश्यक आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक शिळेचे जतन करून त्यासोबत ऐतिहासिक माहिती देणारा माहितीफलक येथे उभारण्यात आला आहे. या स्मारकामुळे विखुरलेल्या 55 सतीशिळांना एकत्रित जतन करून त्यांचा अभ्यास, संशोधन आणि माहितीचे संवर्धन शक्य झाले. गावाच्या सांस्कृतिक स्मृतींना एक नवे रूप प्राप्त झाले आणि विस्मृतीत गेलेला स्थानिक इतिहास पुन्हा जनतेसमोर आला. हे स्मारक इतिहास अभ्यासक, संशोधक आणि पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
विशेष म्हणजे, सतीशिळांना एकत्रितपणे जतन करून ऐतिहासिक संदर्भांसह उभारण्यात आलेले हे स्मारक कोकणातील पहिले सतीशिळा स्मारक म्हणून ओळख निर्माण करत आहे. हा उपक्रम स्थानिक इतिहास, लोकसहभाग आणि वारसा संवर्धन यांचा सुंदर संगम आहे. अशा स्मारकांची उभारणी म्हणजे केवळ दगडांचे संरक्षण नसून आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे रक्षण आहे. सतीशीळा अभ्यासक अनिल दुधाणे यांनी संवर्धनाबाबत महत्त्वाचे काम केले आहे.
महत्त्वाचे स्मारक उभारणीमध्ये स्थानिक धार्मिक आणि सामाजिक संस्थांचाही मोठा सहभाग होता. कडवई ग्रामस्थ आणि वाडी सदस्य, वरदान देवी देवस्थान ट्रस्ट यांनी या उपक्रमाला सक्रिय पाठबळ दिले. या स्मारक उभारणीच्या कार्यात दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे.
कडवई येथील या उपक्रमामुळे आजुबाजूच्या गावांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. अजित राणे यांच्या या उपक्रमामुळे गावातील सतीशिळा, गद्धेगळ, वीरगळ, दुर्लक्षित मूर्ती यांचे एकत्रीकरण होण्यास भविष्यात खूप मोठी मदत होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील तुरळ बस थांब्याजवळून कडवई या सतीशीळा स्मारक असणाऱ्या गावाकडे रस्ता जातो . कडवई गावातील ग्रामदेवता मंदिर परिसरातच सती शिळा स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. येथून जवळच आरवली, गोळवली टप्पा, राजवाडी या ठिकाणी असणारे गरम पाण्याचे झरे, भवानगड ही पर्यटनस्थळे आहेत.