रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
abp majha web team May 31, 2026 01:43 PM

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातल्या ब्रम्हपुरीमध्ये 25 वर्षीय रीलस्टार रोहिणी पाराध्येने ( Rohini Paradhye) मंगळवारी (26 मे 2026) गळफास लावून आत्महत्या केली. 'हॉटेल ग्रामपंचायत' या त्यांच्या हॉटेलमधील स्वयंपाकघरात पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून तिने स्वतःच्या आयुष्याचा दोर कापला. रोहिणी पाराध्ये ( Rohini Paradhye)आणि निलेश पाराध्ये( Nilesh Paradhye) हे दोघेही इंस्टाग्रामवरील त्यांच्या रिल्समुळे लोकप्रिय होते. त्यांच्या मजेशीर रिल्समुळे अनेकांना खळखळून हसवणाऱ्या होत्या. मात्र, एवढं सगळं चांगलं सुरू असताना रोहिणी पाराध्येने कशामुळे जीव संपवला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून रोहिणीवर ब्रम्हपुरीमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, राख सावडण्याच्या वेळी काही नातेवाईकांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकांनी दोन्ही गटाची समजूत काढली मात्र वाद वाढल्याने स्मशानभूमीत काही काळ तणावाचं  वातावरण निर्माण झालं होतं.( Solapur news)

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. शुक्रवारी पोलिसांनी पाराध्ये कुटुंबीयांचे जबाब नोंदवले. रोहिणीच्या इतर नातेवाईकांचे जबाब आज (रविवारी ) नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. रोहिणीच्या मृत्यूचे कारण तपासण्यासाठी पोलीस रोहिणी आणि तिचा पती निलेश यांच्या कॉल रेकॉर्डिंग (CDR ) तपासणार असून त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सीडीआर रिपोर्टनंतर अनेक महत्त्वाच्या कारणांचा उलगडा होऊ शकतो असा अंदाज आहे. 

Rohini Paradhye Death:स्मशानभूमीत नातेवाईकांमध्ये वाद

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरीत स्वतःच्या हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाक घरात रोहिणी पाराध्येने लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली. ज्यावेळी रोहिणीने गळफास घेतला त्यावेळी निलेश हॉटेल बाहेर बसलेला होता. त्याचवेळी तिने किचनमध्ये गळफास घेतल्याची बातमी समोर आली आणि सगळीकडे गोंधळ उडाला. सोमवारी हॉटेलच्या साप्ताहिक सुट्टीनंतर मंगळवारी हॉटेल ग्रामपंचायत उघडलेच गेले नाही. त्याचदरम्यान दुपारी एक वाजताच्या सुमारास रोहिणीने गळफास घेतात महत्त्व केल्याचे समोर आले. त्यानंतर तिला तातडीने मंगळवेढा येथे उपचारासाठी नेण्यात आले मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. 

रोहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीत माती सावडण्याच्या वेळी रोहिणी आणि निलेशच्या कुटुंबातील कुटुंबीय हजर होते. या दुःखद प्रसंगात सगळेच एकमेकांना धीर देत होते. मात्र, कुठलातरी कारणांवरून काही नातेवाईकांमध्ये वाद झाला. उपस्थित लोकांनी दोन्ही गटांची समजूत काढली. मात्र, वाद वाढला. त्यामुळे स्मशानभूमीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अशी माहिती समोर आली आहे. 

Rohini Paradhye Death:रोहिणी पाराध्येने का उचलले टोकाचे पाऊल ?

रोहिणी आणि तिचा पती निलेश यांचा प्रेमविवाह होता. आंतरजातीय विवाह करून दोघेही पुणे येथे काही काळ वास्तव्यास होते. तिथे असतानाच दोघेही रील करू लागले. त्यांच्या मजेशीर रील सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाल्या. नंतर आपल्या मूळ गावी परतल्यावर त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत नावानं व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधील रोजच्या खेळीमेळीच्या वातावरणातील रील बनवून रोहिणी आणि निलेश सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. याच काळात मंगळवेढा तालुक्यातच दोघांनी हॉटेलच्या नव्याने दोन शाखा सुरू केल्या. मात्र दोन्ही शाखांचा व्यवस्थापन, आर्थिक घडी नीट बसवणं आणि शाखा चांगली चालवणं अशी तारेवरची कसरत होत होती . परिणामी दोघांमध्ये वाद आणि तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

Rohini Paradhye Husband Post: रोहिणी पाराध्येच्या नवऱ्याची पहिली पोस्ट

माझी बायको माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं ग...या पाच वर्षांच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणतीच नाही.जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं.

आज चांगले दिवस यायला लागले होते... आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता... पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस.आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम... सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं.चिमणे... परत ये गं... तुला खूप काही सांगायचं बाकी आहे... तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय.तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील. मिस यू ग माझ्या चिमणे..." अशी पोस्ट रोहिणीच्या पतीने केलीय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.