Mumbai News : मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात (Mumbai Real Estate Market) पुन्हा एकदा आश्चर्यचकित करणारा व्यवहार समोर आला आहे. वर्लीतील देशातील सर्वात प्रतिष्ठित निवासी प्रकल्पांपैकी एक असलेल्या 'थ्री सिक्स्टी वेस्ट' (Three Sixty West in Worli) मधील एका आलिशान फ्लॅटसाठी तब्बल 18.06 कोटी रुपयांच्या भाडेकराराची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम घर खरेदीसाठी नव्हे, तर केवळ पाच वर्षे राहण्यासाठी मोजली जाणार आहे. वर्लीतील या आलिशान 'थ्री सिक्स्टी वेस्ट'मधील फ्लॅटसाठी दरमहा 27.5 लाखांपासून ते 33.42 लाखांपर्यंत भाडे आकारलं जात. दरम्यान या पाच वर्षांचा एकूण करार 18.06 कोटींचा झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Mumbai real estate market)
Mumbai News : एका आलिशान फ्लॅटसाठी तब्बल 18.06 कोटी रुपयांच्या भाडेकराराची नोंदणी
मिळालेल्या माहितीनुसार, 27 मे 2026 रोजी नोंदणीकृत झालेल्या या करारानुसार, कोल्हापूरस्थित एसजीजी व्हेंचर्स एलएलपीने वर्ली येथील थ्री सिक्स्टी वेस्टच्या बी टॉवरमधील 22 व्या मजल्यावरील 6,831 चौरस फूट क्षेत्रफळाचा आलिशान फ्लॅट भाड्याने घेतला आहे. या फ्लॅटचे मालक डेराईव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड आहेत. या करारासाठी 1.65 कोटी रुपयांची सुरक्षा ठेव (डिपॉझिट) ठेवण्यात आली असून करारावर 4.73 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले गेले आहे.
Mumbai Real Estate : पहिल्या वर्षात दरमहा 27.50 लाख रुपये भाडे, दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढ
दरम्यान, कराराच्या पहिल्या वर्षात दरमहा 27.50 लाख रुपये भाडे आकारले जाणार आहे. दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढ होत पाचव्या वर्षात हे भाडे 33.42 लाख रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीत एकूण भाडे 18 कोटी 6 लाख 74 हजार 511 रुपये इतके होणार असून सरासरी मासिक भाडे सुमारे 30.11 लाख रुपये आहे. अरबी समुद्र आणि बांद्रा-वर्ली सी लिंकचे विहंगम दृश्य असलेला हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित पत्त्यांपैकी एक मानला जातो. दरम्यान, उद्योगपती राधाकिशन दमानी यांच्या मालकीची डेराईव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मुंबईतील वरळी येथील आलिशान निवासी अपार्टमेंट वन एसजीजी व्हेंचर्स एलएलपी या संजय घोडावत समूहाशी संबंधित संस्थेला भाडेतत्त्वावर दिले आहे. अशी देखील माहिती आहे.
Mumbai Real Estate Market : घर खरेदीपेक्षा भाड्याचा खर्चच अधिक चर्चेत'
या परिसरातील मालमत्तांचे दर सध्या प्रतिचौरस फूट 70 हजार ते 83 हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, या भाडेकरारासाठी खर्च होणाऱ्या 18.06 कोटी रुपयांत वर्ली परिसरातच 2,100 ते 2,500 चौरस फूट क्षेत्रफळाचे स्वतंत्र घर खरेदी करता आले असते. त्यामुळे 'घर खरेदीपेक्षा भाड्याचा खर्चच अधिक चर्चेत' अशी चर्चा आता मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात रंगू लागली आहे. मुंबईतील लक्झरी हाउसिंग सेगमेंटमधील वाढती मागणी आणि उच्चभ्रू ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता या व्यवहारातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या