LPG Price Hike: व्यावसायिक सिलिंडरचे दर पाच महिन्यांत दुप्पट; ४२ रुपयांनी दरवाढ, हॉटेल-ढाबा व्यवसायांवर मोठ्या परिणामांची शक्यता
esakal June 02, 2026 11:45 AM

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जूनच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक आणि पाच किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर ४२ रुपयांनी वाढविले आहेत, तर पाच किलो वजनाच्या सिलिंडरचे दर ११ रुपयांनी वाढले आहेत. गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरांमध्ये सात वेळा वाढ झाली असून, हे दर जवळपास दुप्पट होऊन ३१०० रुपयांच्या पुढे गेले आहेत.

Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा

इराण युद्धाला सुरुवात झाल्यानंतर इंधनाचे दर वेगाने वाढत असून, एलपीजीचे दरही ११ रुपयांनी वाढले आहेत. कोलकता येथे हे दर ५३.५० रुपयांनी वाढून ३ हजार २५५.५० रुपयांवर गेले आहेत. चेन्नई आणि मुंबई शहरांमध्ये या दरात अनुक्रमे ४६ व ४३.५० रुपयांनी वाढ होऊन ते ३ हजार २८३ व ३ हजार ०६७.५० रुपयांवर गेले आहेत.

पाच किलो वजनाचा गॅस सिलिंडरही महागला आहे. स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि छोट्या दुकानदारांसाठी त्याचा मोठा आधार असतो. त्यातील दरवाढ या वर्गाच्या खिशाला झळ ठरणार आहे. तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर मात्र ‘जैसे थे’ ठेवले आहेत.

निर्यातीवरील शुल्क घटविले

पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधन (एटीएफ) निर्यातीवरील शुल्क केंद्र सरकारने घटविले आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील निर्यातशुल्क अनुक्रमे दीड रुपये व १३.५ रुपये प्रतिलिटर इतके निश्चित करण्यात आले आहे. हवाई वाहतुकीसाठीच्या इंधनावरील (एटीएफ) निर्यात शुल्क ९.५ रुपये प्रतिलिटर इतके करण्यात आले आहे.

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत परिणाम काय?

व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरातील वाढीमुळे हॉटेल, ढाब्यावरील जेवणासह मिठाईच्या दरांमध्ये वाढ होऊ शकते. चालू वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये १९ किलो वजनाच्या या सिलिंडरचे दर १ हजार ६९१.५० रुपये इतके होते. ते आता ३ हजार ११३.५० रुपयांवर गेले आहे. सिलिंडर दरामध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.