कुख्यात गुंड सचिन घायवळ याला राजस्थानातून अटक, पुणे पोलिसांची कामगिरी…
Tv9 Marathi June 04, 2026 09:45 PM

कुख्यात गुंड घायवळ निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला राजस्थानातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या दोन्ही बंधूंच्या पुण्यातील कारवायामुळे राज्य आणि देश पातळीवर पुण्याचे नाव बदमान होत आहे. सचिन घायवल याला राजस्थानातून पकडण्यात यश आल्याने आता या प्रकरणातील त्याच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ या दोघा बंधूंच्या कारवायाने पुण्यासह महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ढवळून निघालेली आहे. गुंड निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असल्याचा संशय आहे. त्यातच त्याचा सख्खा भाऊ सचिन घायवळ देखील अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांच्या रडावर होता. त्याच्या विरोधात मोक्का लावण्याची प्रक्रिया देखील पुणे पोलिसांनी सुरु केली होती. निलेश घायवळ याच्या विरोधात यापूर्वी मोक्का लावण्यात आला होता.निलेश याचे शेवटचे लोकेशन लंडन येथे आढळले होते. त्यातच आता सचिन घायवळ पुणे पोलिसांना राजस्थानात सापडला आहे.

नाव आणि वेष बदलून राहात होता

निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सचिन आपले नाव आणि वेष बदलून राजस्थानात रहात होता अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. सचिन घायवळ याचे पुण्यात अनेक लोकांशी राजकीय संबंध आहेत. त्याला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे.

घायवळ गँगला मोठा हादरा

पुण्यातील घायवळ गँगला सचिन घायवळ याच्या अटकेने मोठा हादरा बसल्याचे म्हटले जात आहे. गुंड सचिन घायवळ याला राजस्थानातील सिकर जिल्ह्यातून अटक केली आहे. सचिन याच्या विरोधात खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न, धमक्या देणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. सचिन अनेक महिन्यांपासून फरार होता. सचिन याच्या विरोधात ४४ लाख ३६ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. पुणे येथील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई सुरु केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.