काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे अल्पशा आजाराने निधन
Tv9 Marathi June 04, 2026 11:45 PM

Anantrao Thopte Passes Away : भोर मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक वर्षे भोर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व केले होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकाणाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अनंतराव थोपटे 14 वर्षे मंत्री

भोर तालुक्यातील राजकारणात थोपटे घराण्याचे नाव फार मोठे आहे. अनंतराव थोपटे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्त्व होते. त्यांनी एकूण 14 वर्षं मंत्रिपद भूषवलेलं होते. ते एकूण 6 वेळा भोर मतदारसंघाचे आमदार राहिले. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. काँग्रेस पक्षातही त्यांच्या शब्दाला मोठा मान होता. अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे सध्या राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. संग्राम थोपटे यांचा 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शंकर मांडेकर यांनी पराभूत केले होते.

काँग्रेस पक्ष वाढवण्यात मोलाचे योगदान

अनंतराव थोपटे यांनी पुण्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी त्या काळात खूप प्रयत्न केले. काँग्रेस पक्षवाढीत त्यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. म्हणूनच त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनंतराव थोपटे यांना 1983 साली पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली. त्या काळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी अनंतराव थोपटे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना राज्यमंत्रिपद दिलं. दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना ही मोठी जबाबदारी मिळाली होती.

महत्त्वाच्या खात्याचे सांभाळले मंत्रिपद

अनंतराव थोपटे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या खात्यांचा पदभार सांभाळला. यात उच्च व तंत्रशिक्षण, मदत व पुनर्वसन, परिवहन, पशुसंवर्धन, दुग्दविकास, रोजगार हमी योजना, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन अशा महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला. ते पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालकही होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.