ठाणे : उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात NICU आणि बालकांसाठीची विशेष व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध नसल्याने एका चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेमुळे उल्हासनगरच्या आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे, रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावत, बाळाचे वजन अत्यंत कमी असल्याने त्याला वाचवणे वैद्यकीयदृष्ट्या अशक्य होतं, असा दावा केला आहे.
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या नाजीरा धिरेंद्र राजभर यांनी येथील एका खासगी रुग्णालयात अत्यंत कमी वजनाच्या कन्येला जन्म दिला होता. या चिमुकलीची प्रकृती गंभीर असल्यानं तिला तातडीने NICU (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) आणि बालकांसाठीच्या विशेष व्हेंटिलेटरची गरज होती. नातेवाईकांनी तिला तात्काळ उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं होतं.
रुग्णालयात हवी तशी अत्याधुनिक यंत्रणा नसल्यानं, हताश झालेल्या वडिलांनी मुलीचे प्राण वाचवण्यासाठी मुंबईतील वाडिया, सायन आणि कळवा रुग्णालयाचे उंबरठे झिजवले. बेड मिळवण्यासाठी वडिलांनी मोठी धावपळ केली; परंतु वेळेत हवी ती यंत्रणा आणि उपचार न मिळाल्याने या चिमुकलीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप पसरला आहे.
भाजप नगरसेविका सुचित्रा सिंह यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. शहापूर, मुरबाड, कर्जत, बदलापूर आणि उल्हासनगर परिसरातील हजारो गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी हे मध्यवर्ती रुग्णालय एकमेव मोठा आधार आहे, असे असतानाही येथे बालकांसाठी अत्यावश्यक सुविधा का नाहीत? असा संतप्त सवाल करत सुचित्रा सिंह यांनी रुग्णालयात तातडीने सुसज्ज NICU विभाग सुरू करण्याची मागणी केली आहे.
मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट करताना सांगितले की, 29तारखेला रात्री नऊच्या सुमारास या बाळाला रुग्णालयात आणण्यात आले होते. बाळाची प्रकृती गंभीर असल्याने बालरोगतज्ज्ञांनी तात्काळ उपचार सुरू केले होते. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या 'सीपॅप' (CPAP) यंत्रणेवर बाळाला ठेवण्यात आले होते.
प्रशासनाच्या दाव्यानुसार, 5 ते 6 महिन्यांचे आणि अवघे 500 ग्रॅम वजन असलेले हे बाळ वाचवणे कोणत्याही परिस्थितीत अत्यंत कठीण होते. मुंबईच्या वाडिया रुग्णालयात विशेष NICU व्हेंटिलेटरसाठी त्यांना संदर्भ (Refer) करण्यात आला होता, मात्र तिथे बेड उपलब्ध नसल्याने बाळावर दोन दिवस इथेच सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. रुग्णालयावर होणारे आरोप चुकीचे असून, डॉक्टरांनी बाळाला वाचवण्याचे सर्व प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
ही बातमी वाचा :