'महाराष्ट्रात राहून मला 20 वर्ष झाली, पण...'; मराठी रंगभूमीबाबत सर्वांदेखत कंगना रनौत नेमकं काय म्हणाली?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 05, 2026 09:43 AM

Kangana Ranaut Praises Marathi Actresses: कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा आगामी सिनेमा 'भारत भाग्य विधाता' (Bharat Bhagya Vidhata) 12 जून रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी, निर्मात्यांनी मंगळवारी याचा दमदार ट्रेलर प्रदर्शित केला. ज्यामध्ये कंगना मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. तर, कंगनासोबत सिनेमात तगड्या मराठी अभिनेत्रींची फौज पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak), स्मिता तांबे (Smita Tambe), सुहिता थत्ते (Suhita Thatte) आणि ईशा डे (Esha Dey) या मराठमोळ्या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्यात कंगनानं या सर्व मराठी अभिनेत्रींचं (Marathi Actress) तोंड भरून कौतुक केलं. एवढंच नाहीतर कंगनानं मराठी रंगभूमीचंही (Marathi Theatre) भरभरुन कौतुक केलं. 

मराठी अभिनेत्रींबाबत कंगना कनौत नेमकं काय म्हणाली? (Kangana Ranaut  On Marathi Actress)

बॉलिवूडची 'क्वीन' म्हणून ओळखली जाणाऱ्या कंगना रनौतनं 'भारत भाग्य विधाता' या तिच्या आगामी हिंदी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बोलताना मराठी कलाकार आणि मराठी रंगभूमीचं तोंडभरून कौतुक केलं. मराठी अभिनेत्रींबाबत बोलताना म्हणाली की, "महाराष्ट्रात राहून मला 20 वर्ष झाली आहेत, पण मराठी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळाली. इतक्या जवळून काम करण्याचा अनुभव खूप खास होता. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी किती समृद्ध आहे, हे सर्वांनाच माहीत आहे..."

कंगना रनौतनं सेटवरील तिचा अनुभव सांगताना मराठी अभिनेत्रीं गिरीजा ओक आणि स्मिता तांबे यांचे विशेष आभार मानले. कंगना म्हणाली, "माझ्यासोबत सेटवर काही अत्यंत मदत करणारे लोक होते. चित्रपटातील पात्राचे उच्चार , बोलण्याची पद्धत आणि येथील एकूणच जीवनशैली नेमकी कशी असते, हे समजून घेण्यासाठी मला स्मिता आणि गिरीजा यांनी खूप मदत केली. तुम्ही चित्रपटात पाहू शकता की, आमची केमिस्ट्री खूपच अप्रतिम आणि नैसर्गिक वाटतेय..."

"चित्रपटात आमच्यातील सुंदर ताळमेळ तुम्हाला दिसून येईल. आम्ही मैत्रिणी, सहकारी आणि कुटुंबासाठी सर्व काही करणाऱ्या महिला दाखवल्या आहेत. स्वतःचे कुटुंब आणि देशाप्रती या महिलांच्या मनात असलेली निष्ठा, आदर आणि त्यांची तळमळ पाहून प्रेक्षकही थक्क होतील...", असं कंगना रनौत म्हणाली. 

'भारत भाग्य विधाता'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित (Bharat Bhagya Vidhata Trailer)

'भारत भाग्य विधाता'च्या दमदार ट्रेलरमध्ये असं दर्शवण्यात आलंय की, कंगनाच्या पात्राला तिच्या कामाच्या ठिकाणी फारसं गांभीर्यानं घेतलं जात नाही, किंबहुना, अनेकदा खुद्द रुग्णांकडूनही तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र, जेव्हा एखादा दहशतवादी हल्ला होतो, तेव्हा हीच नर्स आपल्या प्रसंगावधान, धैर्य आणि कर्तव्याप्रती असलेल्या अढळ निष्ठेच्या जोरावर शेकडो लोकांचे प्राण वाचवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. हा सिनेमा एका सामान्य परिचारिकेचा एका कणखर आणि धाडसी व्यक्तीमध्ये होणाऱ्या परिवर्तनाची कथा सांगतो. खरोखरचे नायक स्वतःला 'नायक' म्हणून मिरवत नाहीत, तर जेव्हा गरज उद्भवते, तेव्हा ते पुढे सरसावतात आणि आपलं कर्तव्य पार पाडतात... हा मेसेज या ट्रेलरमधून देण्यात आला आहे. 'भारत भाग्य विधाता' सिनेमा 12 जून रोजी थिएटर्समध्ये रिलीज केला जाणार आहे.

'भारत भाग्य विधाता'चा ट्रेलर पाहिलात?

'छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता...'; रितेश देशमुखचं 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सक्सेस पार्टीतल्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.