- डॉ. मालविका तांबे
गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमध्ये उत्तर प्रदेशात होणारे वीज कपातीबद्दल परिचर्चा सुरू होती. सरकारला दोष देण्याकरिता बरीच माणसे तत्पर होती. एवढेच नव्हे तर सध्या पुण्यासारख्या शहरामध्येसुद्धा मधे-मधे वीज जाणं हे खूप प्रमाणात होत आहे. ह्याचं कारण काय आहे याबद्दल विचार केला तर जाणवतं की संपूर्ण विश्वामध्ये सध्या ग्लोबल वॉर्मिंग अर्थात उष्णता वाढत चाललेली आहे. दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.
संपूर्ण जगात सामान्य तापमान सध्या तीन ते दहा अंश सेल्सिअस अशा प्रमाणात सगळीकडे वाढलेलं दिसतंय. अर्थातच त्याच्यामुळे लोकांच्या घरी पंखा, कूलर, एसीच्या वापराचे प्रमाण भरपूर वाढलंय आणि त्याच्यामुळे उत्पादित होत असलेली वीज पुरत नाही. याच्यामध्ये खरं आश्चर्य काही वाटायला नको. ग्लोबल वॉर्मिंगच पुरेपूर दोष कोणाला देता येत असेल तर तो आहे मानवाला. ही सृष्टी अस्तित्वात आली तेव्हा त्याच्यामधलं संतुलन कसं राखायचं हे प्रत्येक प्राण्याला, झाडांना, पक्ष्यांना पूर्णपणे समजत होतं. फक्त एक मनुष्यच असा प्राणी आहे की जो सगळीकडे स्वतःचा भौतिकतावाद वापरून संपूर्ण सृष्टीचा ऱ्हास करू लागलेला आहे.
आयुर्वेदशास्त्र मात्र हे प्राचीन वेदांमधून आलेलं शास्त्र आहे ज्याच्यामध्ये निसर्ग आणि त्यातही मुख्य वृक्ष, त्याची पानं, फुलं, मूळ याच्याशी संबंधित आहे व एवढेच नव्हे तर आपल्या आजूबाजूला असलेले इतर पशुपक्षी याचं महत्त्वही. ते समजावतं. आरोग्य जपण्यासाठी आपल्याला याची आपल्याला गरज असते हे आयुर्वेदाच्या माध्यमातून समजू शकतं.
लहान मुलांना जंतुसंसर्ग होऊ नये त्याच्याकरिता घरामध्ये विशिष्ट वनस्पती द्रव्ये बाळगुटीच्या माध्यमातून ठेवणं. गर्भवतीचा गर्भपात होऊ नये म्हणून तिला वेगवेगळे औषध वापरणं. डोळ्यांच्या व नसाच्या आरोग्याकरिता दूर्वांचा वापर करता येतो. शरीरातली रोगप्रतिकार क्षमता वाढवायला आवळा, हळदचा वापर करता येतो. हृदयाची कार्यक्षमता वाढवायला अर्जुनच्या छालीचा उपयोग होतो.
असे असंख्य गोष्टींचा शोध आयुर्वेद शास्त्राने लावला आणि जो देतो तो महान असतो. त्याला आदर दिला पाहिजे. त्याच्या अस्तित्वाला मदत करायला पाहिजे. त्याचं रक्षण करायला पाहिजे. जेणेकरून आपलंही रक्षण होऊ शकेल हा विचार आयुर्वेद शास्त्रातून मांडला गेला. त्याच्याच विरुद्ध आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती हा फक्त निसर्गाला ओरबाडायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यातनं जे असंतुलन निर्माण होतंय ते सर्व प्राणिमात्राकरिता पुढे जाऊन घातक ठरणार आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.
भौतिकतावादचं ज्वलंत उदाहरण सध्याच्या काळात दिसतं ते म्हणजे प्रत्येक गोष्ट डोळ्याला आणि मनाला आकर्षक असली तरच तिचा वापर केला जातो. कुठलीही गोष्ट सध्या बाजारातनं विकत आणली की त्याचं पॅकेजिंग हे एक मोठ्ठ व्यापार बनलेलं आहे. प्रत्येक गोष्टीकरता तयार केलेला एखादा कार्डबोर्डचा बॉक्स असतो. त्याच्यानंतर त्याच्या आत स्पंज किंवा थर्मोकोल हे पॅकिंग करता टाकलं जातं.
भरपूर प्रमाणात त्याला वरतून सेलो टेप वगैरे लावल्या जातात. घरी आल्यानंतर ती वस्तू जेव्हा आपण वापरायला घेतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला दिलेले हे सगळे आवरणं आपण अक्षरशा कचऱ्याच्या पेटीत टाकतो. कार्डबोर्डचा बॉक्स बनवण्यामध्ये कितीतरी वृक्षांचं नुकसान होतं. एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये वापरलं जाणारं फोम, बबल पेपर हे निसर्गामध्ये पटकन बायोडिग्रेडेबल नसतात त्यामुळे ब-बरेच काळ ह्याच्यामुळे प्रदूषण होत राहतं.
हा जो कन्झ्युमर ॲटिट्यूड सध्याच्या काळात आलेला आहे याला खरं रद्द करण्याची गरज आहे. आमच्या संतुलनच्या फार्मसीमध्ये सुरुवातीपासून आत्म्याला महत्त्व दिलं जातं. फक्त आतल्या औषधाच्या गुणवत्तेवरती आपण लक्ष द्यायचो. पॅकेजिंग अगदी साधं सोपं. फक्त वापरणारी बॉटल व त्याच्यावरती असलेलं माहितीच स्टीकर एवढंच पॅकेजिंग.
बरीचशी मंडळी आम्हाला आता सांगायला लागलेली आहे की, अहो, तुमची औषधे खूप उत्तम असली तरीसुद्धा त्याची पॅकेजिंग आकर्षक करायला तुम्हाला बाहेर एखादं बॉक्स देण्याची गरज आहे. त्याला वेगवेगळे मस्त नजरेला भावतील अशा प्रकारचे डिझाइन रंग तुम्ही करायला सुरुवात करा. शेल्फवरती संतुलनचं प्रॉडक्ट दिसलं की लगेचच मनुष्य आकर्षित झाला पाहिजे.
हा सगळा तयार होणारा कचरा शेवटी एकत्र होऊन कुठेतरी मोठ्या कचराकुंडीपर्यंत नेला जातो. आम्ही लोणावळ्यात राहतो. तिथे एक खूप मोठी जागा अशा कचऱ्याकरता नमूद केलेली आहे. त्याच्या आजूबाजूने जाताना इतका दुर्गंध आणि वाईट दृश्य असतो. अमेरिकेसारख्या ठिकाणी तर मोठ्या मोठ्या land fields तयार केल्या जातात. जिथे जमिनीत खड्डा खणून त्याच्यामध्ये संपूर्ण कचरा टाकला जातो व नंतर वरती हिरवळ तयार केली जाते. संतुलन आयुर्वेद किंवा एकूणच कुठलीही आयुर्वेदिक pharmacy ही सहसा पर्यावरणाला धरून असते.
आमच्याकडे निघणारा कुठलेही waste product आहे ते सहसा वनस्पतीजन्यच असतं आणि त्यामुळे त्याचा वापर आम्ही आमच्याच इथल्या वर्मी कंपोस्टमध्ये करत असतो. हेच वर्मी कंपोस्ट आम्ही आमच्याकडे उगवण्यात येणाऱ्या सगळ्या ताज्या वनस्पती, भाज्या, फळं इत्यादींमध्ये वापरतो. त्यामुळे reuse, recycle या सगळ्याचा विचार आपल्या फार्मसीमध्ये केला जातो.
फार्मसीमध्ये औषध बनवत असताना वेगवेगळ्या वनस्पतींचा वृक्षांचा वापर केला जातो. त्याकरता सुद्धा त्यांना धन्यवाद देणे, त्यांची क्षमा प्रार्थना करणे हा नियम संतुलन आयुर्वेदामध्ये पाळला जातो. एवढेच नव्हे तर. नवीन वृक्षांचे सतत रोपण करत राहणे याच्याकरता सुद्धा सतत प्रयत्नशील असतो. रोज सकाळी. आमच्याकडे असलेल्या मोठ्या औदुंबर वृक्षाला संपूर्ण निसर्गाचं प्रतिनिधी म्हणून धन्यवाद देण्याची सुद्धा प्रथा आहे.
धत्ते भारं कुसुम पत्र फलावलीनां
घर्मव्यथां वहति शीतभवं रुजं च ।
यो देहमर्पयति चान्य सुखस्य हेतो:
तस्मै वदान्य गुरुवे तरवे नमोस्तु ।।
अर्थात फुले, पाने आणि फळांच्या समूहाचे ओझे वाहणारा, उन्हाची झळ आणि थंडीचा त्रास सहन करणारा, आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःचे संपूर्ण शरीर अर्पण करणारा जो वृक्ष आहे, त्या उदार गुरू स्वरूप वृक्षाला माझा नमस्कार.
एकूणच आयुर्वेद शास्त्र हे मानवाच्या कल्याणाचं शास्त्र आहे. त्यामुळे भारतीय परंपरेत वृक्ष व नैसर्गिक संपदेला खूप महत्त्व दिलेलं आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यावरती निसर्गाचे होणारे सकारात्मक परिणाम, प्रभाव व योगदान या सगळ्यांची जाणीव ठेवून. त्यांचा ऱ्हास तरी करणार नाही असं प्रण घेणं प्रत्येकाला आवश्यक आहे.