राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, अवकाळी पावसाचे थैमान, पुढील 24 तास धोक्याची..
GH News June 05, 2026 10:10 AM

मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. हळूहळू करून तो पुढे सरकेल. राज्यात मॉन्सूनला पोषक वातावरण आहे. मॉन्सून राज्यात दाखल होण्यापूर्वीच भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. हा मॉन्सूनचा पाऊस नसणार आहे, हा अवकाळी पाऊस आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम या भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. अकोला, वर्धा, ब्रह्यपुरी, नागपूर या जिल्ह्यांमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती, भंडारा, गोदिंया,जळगाव जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आज अहिल्यानगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, गडचिरोली, गोदिंया, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे थैमान बघायला मिळेल. 15 जूनपर्यंत साधारणपणे राज्यात अवकाळी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर भागात मान्सून पूर्व पाऊस झाला आहे, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसाने वातावरणातील उष्णता कमी झाली. गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळी दररोज पाऊस कोसळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या करमाळा शहरात पावसाने हजेरी लावली आहे. दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि आकाश ढगांनी ओसंडून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात मॉन्सून अजून दाखल झाला नसला तरीही अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस बघायला मिळत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पावसाचा येलो अलर्ट राज्यात जारी केला. देशातील अनेक राज्यातही अवकाळी पाऊस सुरू आहे. जवळपास 17 राज्यांमध्ये अवकाळी पावसासह मोठ्या वादळाचा इशारा दिला. केरळमध्ये यंदा 2 दिवस उशिराने मॉन्सून दाखल झाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.