दक्षिणेतील भाजपच्या बड्या नेत्याचा राजीनामा, विजय यांची कॉपी करुन बनवणार नवीन पक्ष
Tv9 Marathi June 05, 2026 05:45 PM

मागच्या दोन-चार दिवसांपासून जी चर्चा होती, ती अखेर खरी ठरली आहे. के.अन्नामलाई यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ते तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजप सोडण्याआधी अन्नामलाई दिल्लीला आले होते. आज अन्नामलाई यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. पक्ष सोडल्यानंतर अन्नामलाई यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “आजपासून आपण एक आंदोलन सुरु करत आहोत. आपला राजकीय पक्ष पुढची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढेल” असं अन्नामलाई म्हणाले. “मी भाजपचा आहे की तामिळ हे ठरवणं माझ्यासाठी कठीण बनलं होतं” असं भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अन्नामलाई बोलले.

“4 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी मी राजीनामा देणार असं पक्षाला सांगितलं होतं. पक्षाने मला निवडणुका झाल्यानंतर जा असं सांगितलं होतं” असं अन्नामलाईम्हणाले. “तामिळनाडूच्या लोकांना समजेल अशा भाषेत राष्ट्रीय पक्ष कधी बोलले नाहीत. मी हा विचार बदलण्याचा प्रयत्न केला. अनेक अंतर्गत आणि बाहेरील अडथळे असूनही बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरलो. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने जे समर्थन दिलं, त्या बद्दलही त्यांनी आभार मानले”

विजय यांची कॉपी करणार

तामिळनाडूतील युवा नेत्यांना हेरुन, त्यांना ट्रेनिंग देण्याच्या दृष्टीने अन्नामलाई एक जन आंदोलन उभारणार आहेत असं त्यांच्या जवळच्या माणसांनी सांगितलं. पुढे जाऊन हे आंदोलन राजकीय पक्षात बदलता येईल असा त्यामागचा विचार आहे. ‘वी द लीडर्स’ नावाच एक उपक्रम त्यांच्याकडून सुरु आहे. त्यांच्या राजकीय महत्वकांक्षेच्या दृष्टीने हा प्रोजेक्ट महत्वाचा आहे. तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याची अन्नामलाई यांची योजना आहे. कारण थलपती विजय राजकारणात येण्याआधी त्यांचा फॅन क्लब होता. त्या माध्यमातून त्यांनी समाज कल्याणाची काम केली. पुढे जाऊन याच फॅन क्लबच TVK या राजकीय पक्षात रुपांतर केला.

अन्नामलाई यांच्या राजीनाम्यावर भाजपची प्रतिक्रिया आली आहे. तामिळनाडू भाजप अध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी म्हटलं की, अन्नामलाईच्या पक्ष सोडण्याने पार्टीचं काही नुकसान होणार नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.