पुणे - गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ५२९ झाडे तोडली जाणार आहेत. याविरोधात पर्यावरणप्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत. यात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वृक्षतोड न करता पर्यायी आराखड्याची अंमलबजावणी करा. तसेच या संदर्भात पुढील आठ दिवसांत बैठक बोलावण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
रिझर्व्ह बँक इन्स्टिट्यूट ते संचेती चौक दरम्यानच्या ४५ मीटर रुंदीकरणासाठी सुमारे ५२९ वृक्ष तोडली जाणार आहेत. याचा प्रस्ताव महापालिकेने १ मार्च रोजी वृक्ष प्राधिकरणासमोर मांडला होता. यावर २ एप्रिल रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करून हरकती मागवण्यात आल्या होत्या. याला प्रतिसाद देत पुणेकरांनी मोठ्या संख्येने हरकती नोंदवल्या आहेत. महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन नियमानुसार, एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या हरकतींवर नागरिकांना प्रत्यक्ष बोलावून सुनावणी घेणे बंधनकारक आहे.
मेट्रो मार्ग ३ च्या खांबांमुळे रस्त्याची रुंदी काही ठिकाणी आधीच मर्यादित झाली आहे. त्यामुळे केवळ झाडे कापून वाहतूक कोंडी सुटणार नाही. 'परिसर' आणि इतर पर्यावरण संस्थांनी सुचवलेल्या पर्यायी आराखडा तयार करण्यात आला आहे. यात उपलब्ध जागेतच सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्गासह नियोजन करणे शक्य असल्याचे सुचविण्यात आले आहे. यामुळे एकही झाड कापण्याची गरज पडणार नाही.
या वादावर तोडगा काढण्यासाठी तूर्त या प्रस्तावाला स्थगिती द्यावी. पुढील आठ दिवसांत महापालिकेचे शहर अभियंता, वाहतूक पोलिस, 'परिसर' संस्था आणि मॉडेल कॉलनी पर्यावरण समितीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करावी. तज्ज्ञांच्या पर्यावरणपूरक आराखड्याचा प्रत्यक्ष जागेवर पडताळा घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, असेही नीलम गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.