Mumbai News : केबल चोरीच्या प्रयत्नाने सिग्नल यंत्रणा ठप्प; पनवेल-वाशी मार्गावरील लोकल सेवा दोन तास विस्कळित; सायंकाळच्या गर्दीत हजारो प्रवासी अडकले
esakal June 06, 2026 02:45 AM

मुंबई - पनवेल परिसरात रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी संबंधित केबल कापून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पनवेल-वाशी सेक्शनमधील अप आणि डाउन मार्गावरील सिग्नल यंत्रणा ठप्प पडली. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे अनेक लोकल गाड्या खोळंबल्या, तर काही गाड्या विलंबाने धावल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर रात्री आठच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलजवळील रेल्वे मार्गालगत अज्ञात व्यक्तींनी सिग्नल यंत्रणेशी जोडलेली महत्त्वाची केबल कापून नुकसान केले. प्राथमिक तपासात केबल चोरी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी ६.१४ वाजता हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर पनवेल-वाशी सेक्शनमधील अप आणि डाउन मार्गावरील सिग्नल यंत्रणा कोलमडली आणि रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला.

सिग्नल यंत्रणा बंद; प्रवासी हैराण

सिग्नल यंत्रणा ठप्प पडल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने विशेष सुरक्षा पद्धती लागू केल्या. परिणामी या मार्गावरील रेल्वे वाहतूक मंदावली. अनेक लोकल गाड्या स्थानकांदरम्यान थांबल्या, तर काही गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावल्या. कार्यालयीन वेळेनंतर घरी परतणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. वाशी, नेरूळ, सीबीडी बेलापूर आणि पनवेल स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले.

तब्बल दोन तासाने वाहतूक पूर्ववत

घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या सिग्नल व दूरसंचार विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नुकसानग्रस्त केबल शोधून तिची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री ८ वाजून ४ मिनिटांनी बिघाड दूर करण्यात आला. त्यानंतर सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाली आणि लोकल वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आली.

रेल्वेचा तपासाला वेग

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, सिग्नल यंत्रणेशी संबंधित केबलमध्ये छेडछाड होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा घटनांमुळे रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणी करण्यात येत असून संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

पनवेल परिसरात रेल्वेच्या केबल कापण्याच्या घटनांबाबत यापूर्वीही तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे संवेदनशील ठिकाणी गस्त वाढविण्यासह सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.