Bigg Boss Tamil Fame Julie Allegation On Thalpathy Vijay TVK: 2017 मध्ये जलीकट्टू आंदोलनामुळे (Jallikattu Movement) चर्चेत आलेली अभिनेत्री आणि माजी नर्स ज्युली उर्फ ज्युलियाना हिनं विजय थलपती (Thalpathy Vijay) यांच्या टीव्हीके (Tamilaga Vettri Kazhagam) पक्षाविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. सोशल मीडियावर सातत्यानं होणारं ट्रोलिंग आणि चारित्र्यहनन विरोधात चेन्नई पोलिसांत (Chennai Police) तक्रार दाखल केली आहे.आरोपीनं अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. सततचं ऑनलाईन ट्रोलिंग (Online Trolling), छळवणूक (Online Harassment) आणि बदनामीविरोधात गंभीर मानसिक त्रास सहन करावा लागल्याचं म्हटलंय. तसेच, अभिनेत्रीनं या सर्व गोष्टींचा त्रास वैयक्तिक आयुष्यावर झाला असून त्यामुळे गर्भपाताला (Miscarriage) सामोरं जावं लागल्याचा आरोप केला आहे.
Bigg Boss Tamil मधील स्पर्धक असलेल्या अभिनेत्री ज्युलीनं दावा केलाय की, अभिनेते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या चाहत्यांकडून आणि त्यांच्या 'तमिळगा वेत्री कझगम' (TVK) पक्षाच्या समर्थकांकडून झालेल्या ट्रोलिंगमुळे तिचा गर्भपात झाला. सोशल मीडियावरील ट्रोलिंगविरोधात तिनं मार्च महिन्यात पोलिसांकडे धाव घेत आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केलीय. या प्रकरणानंतर सोशल मीडियावरील ट्रोलिंग, सायबर छळ आणि सार्वजनिक व्यक्तींवरील ऑनलाइन हल्ल्यांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी ज्युली यांच्या तक्रारीची दखल घेतली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री ज्युलीचं नेमकं म्हणणं काय?
भावूक झालेल्या अभिनेत्री ज्युलीनं सांगितलं की, मार्च महिन्यातच या 'ट्रोलिंग'बाबत पोलिसांशी संपर्क साधण्यात आला होता आणि आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. तिला एक नोटीस मिळाली होती, ज्यात असं म्हटलं होतं की, हे प्रकरण फौजदारी गुन्ह्याऐवजी दिवाणी स्वरूपाच्या अब्रुनुकसानीचे (Civil Defamation) आहे. डीएमके (DMK) कडून टीव्हीके (TVK) कडे सत्ता गेल्यानंतरच तिला ही नोटीस का मिळाली? याबद्दलही अभिनेत्रीनं आश्चर्य व्यक्त केलंय. तिनं असा आरोप केलाय की, त्यानंतरच तिच्यावर 15 लाख रुपयांच्या किडनी घोटाळ्यासंदर्भातले आरोप करण्यात आलेत.
अभिनेत्री ज्युलीनं पुढे बोलताना म्हटलं की, "त्यांनी यासाठी एक सविस्तर कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि कथानक रचलं..." आणि या आरोपांमागे टीव्हीकेचे समर्थक आणि एक वकील असल्याचा दावा केला. ज्युली पुढे म्हणाली की, "आम्ही आमचं मूल गमावलंय. माझं नुकतंच लग्न झालेलं आणि आम्ही आमच्या पहिल्या बाळाला गमावलंय. ऑनलाइन छळामुळे झालेल्या तीव्र मानसिक त्रासामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झालाय. सहानुभूती मिळवण्यासाठी मी याचा वापर करू शकले असते, पण माझा मुद्दा असा आहे की, माझ्या पतीबद्दल आणि माझ्याबद्दल अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय टिप्पण्या केल्या जात आहेत. केवळ एका महिलेनं टीव्हीकेबद्दल आवाज उठवला म्हणून तुम्ही कोणताही विचार न करता तिची बदनामी करता... आता मला यावर काहीही बोलायचं नाही..."
ज्युलीचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यावरही गंभीर आरोप
अभिनेत्री ज्युली तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांना तिच्या सर्व मनस्तापासाठी दोषी मानते. ज्युलीचं म्हणणं आहे की, "लोक म्हणतात की, विजय अण्णा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले. ज्यांनी त्यांच्या समर्थकांविरुद्ध आवाज उठवला, त्यांच्यावर हल्ले करण्यास प्रवृत्त करण्याऐवजी, त्यानं जनतेसाठी काहीतरी करण्यावर लक्ष केंद्रीत करायला नकोत का?" जेव्हा एका पत्रकारानं निदर्शनास आणून दिलं की, निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या होत्या आणि विजयनं मे महिन्यात पदभार स्वीकारला होता, त्यावेळी डीएमके (DMK) सत्तेवर होतं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली की, "मी डीएमकेच्या कार्यकाळात, निवडणुकांच्या सुमारास तक्रार दाखल केली होती. पण आता दुसरं सरकार सत्तेवर असताना, त्यांनी जबाबदारी घ्यायला नको का?"
"माझ्या मुलाच्या मृत्यूला विजय अण्णा जबाबदार..."
तिनं आरोप केलाय की, तिच्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेतली जात नाहीये, कारण तिनं ज्या आठ व्यक्तींवर आरोप केलेत त्या टीव्हीके (TVK) च्या समर्थक आहेत. पत्रकार परिषदेत भावूक होत ती म्हणाली, "माझ्या मुलाच्या मृत्यूला विजय अण्णा जबाबदार आहेत..." ती पुढे म्हणाली की, "कदाचित त्यांनी हे थेट केलं नसेल, पण जर त्यानं फक्त एक शब्द उच्चारला असता आणि त्यांना माघार घ्यायला सांगितलं असतं, तर आज मला माझं सर्वस्व गमवावं लागलं नसतं..."
दरम्यान, पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला की, ती टीव्हीके समर्थक आणि विजय यांचा संबंध निनावी खात्यांशी का जोडतेय? आणि डीएमके सत्तेवर असताना तिनं आवाज का उठवला नाही? त्यावर अभिनेत्री म्हणाली की, "मी आता आवाज उठवतेय, कारण माझ्यासोबत हे घडलंय..."