केस कटिंग, दाढीचे दर वाढले; महाराष्ट्र नाभिक महामंडळाने जारी केलं नवं दरपत्रक
esakal June 06, 2026 03:45 PM

महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सलून सेवांच्या दरामध्ये २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ही दरवाढ ६ जून २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. हा निर्णय केवळ दरवाढ नसून, राज्यातील हजारो सलून व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न असल्याचे नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष सयाजी झुंजार यांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह छोट्या व्यावसायिकांनाही बसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे इंधन दरात झालेली वाढ आता प्रत्येक वस्तू आणि सेवेमध्ये दिसून येत आहे.

वाहतूक खर्च वाढल्यामुळे बाजारातील प्रत्येक वस्तू महाग झाली आहे. सलून व्यवसायासाठी लागणारे शॅम्पू, हेअर कलर, ब्लीच, फेशियल क्रीम, जेल, वॅक्स, डिस्पोजेबल वस्तू, टॉवेल धुण्याचे साहित्य, निर्जंतुकीकरणासाठी लागणारे पदार्थ आणि इतर अनेक वस्तू पेट्रो-केमिकल उद्योगाशी संबंधित आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीचा थेट परिणाम या वस्तूंवर झाला आहे. लॉरियल, वेला, श्वार्झकॉफ, गोदरेज यांसारख्या नामांकित देशी-विदेशी कंपन्यांनी गेल्या काही काळात त्यांच्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. मात्र ग्राहकांना परवडावे म्हणून अनेक सलून व्यावसायिकांनी स्वत:चा नफा कमी करून सेवा सुरू ठेवल्या. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की, जुने दर ठेवून व्यवसाय चालवणे अशक्य झाले आहे.

कारने धडक देताच दुचाकीवरील चौघे हवेत उडाले, चिमुकलीसह चौघांचाही जागीच मृत्यू; घटनास्थळी रक्ताचा सडा ग्राहकांच्या सेवेसाठी झटणारा कारागीर स्वत:च अडचणीत

प्रदेश कोषाध्यक्ष रामदास पवार म्हणाले की, सकाळपासून रात्रीपर्यंत उभे राहून काम करणारा सलून व्यावसायिक स्वत:च्या कुटुंबासाठी दोन वेळचे अन्न, मुलांचे शिक्षण, घरभाडे, वीजबिल, दुकानाचे भाडे, कर, कर्जाचे हप्ते आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडत असतो. वाढत्या महागाईमुळे या सर्व खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिक गंभीर आहे. अनेक गावांमध्ये सलून व्यवसाय हा कुटुंबाच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे. ग्राहकसंख्या मर्यादित असताना खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक नाभिक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

प्रदेश उपाध्यक्ष विष्णू वखरे यांनी म्हटलं की, अनेक सलून व्यावसायिकांनी दुकानांचे आधुनिकीकरण, नूतनीकरण किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे. वाढत्या व्याजदरांमुळे या कर्जांचे हप्तेही वाढले आहेत. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर, परवाना शुल्क, वीजबिले आणि दुकानभाड्यातील वाढ यामुळे व्यावसायिकांचा आर्थिक ताळमेळ पूर्णपणे बिघडला आहे. अनेकजण केवळ व्यवसाय टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

समाजानेही समजून घेण्याची गरज

वर्षानुवर्षे कमी नफ्यात सेवा देत समाजाची सेवा केली आहे. मात्र आज वाढत्या महागाईमुळे सलून व्यवसाय चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. ही दरवाढ आमची मजबुरी आहे, निवड नाही. राज्यातील लाखो नाभिक कुटुंबांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार, उपाध्यक्ष विष्णू वखरे, कार्याध्यक्ष श्याम आस्करकर, सरचिटणीस घनश्याम वाघ, कोषाध्यक्ष रामदास पवार, चिटणीस विकास मदने यांनी केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.